GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी : चरित्रकार धनंजय कीर साहित्य नगरीत होणार २२ नोव्हेंबरला जिल्हा साहित्य संमेलन

Gramin Varta
40 Views

रत्नागिरी: चरित्रकार धनंजय कीर साहित्य नगरीत येत्या २२ नोव्हेंबर रोजी रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलन भरणार आहे. डॉ. राजन गवस यांच्या अध्यक्षतेखाली होणार असलेल्या या संमेलनाचे उद्घाटन मराठी भाषामंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे.

नवनिर्माण शिक्षण संस्थेचे संचालक अभिजित शेट्ये यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले, नवनिर्माण शिक्षण संस्थेने मराठी भाषा विभाग आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने अनुदान दिलेले हे रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलन दिवसभर विविध कार्यक्रमांनी पार पडणार आहे. यानिमिताने विविध परिसंवाद, काव्यसंमेलन, सांस्कृतिक कार्यक्रमांचा जागर असणार आहे. स्वागताध्यक्ष अभिजित हेगशेट्ये, प‌द्मश्री मधू मंगेश कर्णिक, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ, साधनाचे संपादक विनोद शिरसाठ, सामाजिक कार्यकर्त्या श्रीगौरी सावंत, युवा कवी अनंत राऊत, युवा शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप मुणगेकर, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार, माहिती अधिकारी प्रशांत जगताप यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. मराठी भाषा विभाग व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीने संपूर्ण राज्यभर साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले असून रत्नागिरी जिल्ह्याचे साहित्य संमेलन आयोजित करण्याचा बहुमान नवनिर्माण शिक्षण संस्थेला मिळाला आहे. या संमेलनामध्ये नवनव्या संकल्पना हाती घेण्यात आल्या आहेत. संमेलनपूर्व कार्यक्रमामध्ये महावि‌द्यालयीन वि‌द्यार्थ्यांसाठी निबंध व काव्यवाचन स्पर्धा आयोजित करण्यात आली असून संमेलनामध्ये युवकांना जास्तीत जास्त तरुणांना सहभागी करून घेण्याचा प्रयत्न असेल.

संमेलनाची सुरुवात उषःकाल काव्य मैफिल या विशेष कार्यक्रमाने होणार आहे. खल्वायन संस्थेच्या माध्यमातून ही मैफिल सकाळी ६ वाजता रंगणार आहे. यानंतर रत्नागिरी शहरातील शाळा, महावि‌द्यालयाच्या वि‌द्यार्थ्यांची ग्रंथदिंडी जे. के. फाइल्स ते साहित्य नगरीपर्यंत सकाळी ७.३० वाजता निघेल. यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बदीउज्जमा खावर सभागृह, माधव कोडविलकर ग्रंथप्रदर्शन आणि चरित्रकार धनंजय कीर साहित्य नगरी या व्यासपीठाचे उ‌द्घाटन होईल, सकाळी ९ वाजता उद्धाटन होईल.

सकाळी ११.३० ते १२.३० या वेळेत सामाजिक कार्यकर्ती श्रीगौरी सावंत यांची विशेष मुलाखत प्रा. अश्विनी कांबळे व संजय वैशपायन घेणार आहेत. दुपारी १२.३० ते १.३० या वेळेत चरित्रकार धनंजय कीर साहित्यनगरीमध्ये डिजिटल युग आणि साहित्यिक जबाबदारी हा परिसंवाद होणार आहे. युवा संशोधक डॉ. प्रतीक मुणगेकर हे या परिसंवादाचे अध्यक्ष असून यामध्ये डॉ. मीनल ओक, माधव अंकलगे, हेमंत वणजू, अनुया बिर्जे, मयूरी जोशी यांचा सहभाग असेल.

बदीउज्जमा खावर सभागृहात दुपारी १२.३० ते १.३० या वेळेत युवा आणि मराठी साहित्याची नवी वाट हा परिसंवाद रंगणार आहे. या परिसंवादात ज्येष्ठ निवेदक जयू भाटकर (अध्यक्ष), सुहास बारटक्के, रश्मी कशेळकर, बाळासाहेब लबडे, मल्हार इंदुलकर, प्रसाद गावडे, दुर्गेश आखाडे, मदन हजेरी यांचा सहभाग असेल.

दुपारी २.३० ते ३.०० या वेळेत चरित्रकार धनंजय कीर साहित्यनगरीमध्ये २१ व्या शतकातील अभिव्यक्ती, व्यवहार आणि साहित्य हा परिसंवाद होणार आहे. यामध्ये विनोद शिरसाठ (अध्यक्ष), प्रदीप कोकरे.. सिद्धार्थ देवधेकर, अनिल दांडेकर, ईश्वरचंद्र हलगरे, प्रा. राजरत्न दवणे, प्रा. ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा समावेश आहे.

दुपारी २.३० ते ३.३० वा. बदीउज्जमा खावर सभागृहात संगमेश्वरी कोकणी (मुस्लिम) बोलीभाषा आणि संस्कृती हा परिसंवाद डॉ. निधी पटवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली होईल. यामध्ये अरुण इंगवले, सारिका आडविलकर, प्रभाकर डावल, समीर गडबडे, अमोल पालये, अलिमियाँ काझी यांचा सहभाग असेल.

दु. ३.३० ते सायं. ४.३० वा. युवा कवी अनंत राऊत यांची विशेष काव्यमैफल रंगणार आहे. त्यामध्ये संगीता अरबुणे, अमृता नरसाळे, अभिजित नांदगावकर, कैलास गांधी, अरुण इंगवले, राष्ट्रपाल सावंत, अरुण मोर्ये, अमेय धोपटकर आदींचा सहभाग असेल. सायंकाळी ४.३० वा. साहित्य संमेलनाचा समारोप कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थित पार पडेल. कोकणचा साज, संगमेश्वरी बाज या सांस्कृतिक कार्यक्रमाने संमेलनाचा समारोप होणार आहे.

Total Visitor Counter

3199276
Share This Article