GRAMIN SEARCH BANNER

उच्च न्यायालयाकडून सातारा, पालघर जिल्हा सत्र न्यायाधीश बडतर्फ

Gramin Varta
12 Views

मुंबई : सातारा जिल्हा न्यायाधीश धनंजय निकम आणि पालघर जिल्हा सत्र न्यायाधीश इरफान शेख या दोघांना सेवेतून बडतर्फ करण्यात आल्याचे आदेश नुकतेच काढण्यात आले आहेत. त्यानुसार, त्यांना १ ऑक्टोबरपासून पदमुक्त होण्यास सांगण्यात आले होते.

जामीन देण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप सातारा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश निकम यांच्यावर होता. त्यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकपूर्व जामिनासाठी आधी सत्र न्यायालयात व नंतर उच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु, दोन्ही न्यायालयांनी त्यांना दिलासा देण्यास नकार दिला होता. तथापि, त्यांनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले नव्हते. याप्रकरणी त्यांची उच्च न्यायालय प्रशासनाच्या शिस्तपालन समितीकडून चौकशी होऊन अहवाल सादर करण्यात आला होता. त्या अहवालाच्या आधारे त्यांच्या बडतर्फीचा आदेश काढण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

दुसरीकडे, शेख यांच्यावर देखील अशाच स्वरूपाचे आरोप होते आणि त्यांचीही समितीकडून चौकशी करण्यात आली होती. मुंबईतील बॅलार्ड पिअर न्यायालयात दंडाधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांच्याकडे अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्याची प्रकरणे सुमावणीसाठी होती. त्यावेळी, कारवाईदरम्यान जप्त केलेल्या आणि मुद्देमाल म्हणून न्यायालयात सादर केलेल्या अमली पदार्थांची ते तस्करी करत होते, असा आरोप करणारी याचिका उच्च न्यायालयात करण्यात आली होती.

कॉर्डिलिया क्रूझवरील पार्टीला शेख हे उपस्थित होते आणि त्यांनीही नशा केली होती. परंतु, क्रूझवरील पार्टीवर छापा टाकणाऱ्या केंद्रीय अमली पदार्थ विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना तेथून बाहेर काढले, असा आरोपही याचिकेत करण्यात आला होत. याप्रकरणी आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाप्रकरणी शेख यांच्याविरुद्ध तक्रार करून कारवाईची मागणी केली होती. परंतु, काहीच कारवाई न केल्याने याचिका केल्याचे याचिकेत म्हटले होते. ही याचिका प्रलंबित आहे.

Total Visitor Counter

2647915
Share This Article