GRAMIN SEARCH BANNER

संजय गांधी निराधार योजनेचे पेन्शन ५ हजार रुपये करा; चक्रभेदी सोशल फौंडेशनची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Gramin Varta
146 Views

रत्नागिरी: समाजातील विधवा आणि एकल महिलांच्या प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी चक्रभेदी सोशल फौंडेशनच्या वतीने जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना नुकतेच सविस्तर निवेदन देण्यात आले. या निवेदनात प्रामुख्याने विधवा व एकल महिलांचे तातडीने सर्वेक्षण करावे आणि संजय गांधी निराधार योजनेचे पेन्शन ५ हजार रुपयांपर्यंत वाढवावे, अशी महत्त्वाची मागणी करण्यात आली आहे. महिलांना सर्व शासकीय योजनांचा लाभ एकाच छत्राखाली मिळावा, यासाठी प्रशासनाने विशेष पावले उचलण्याची गरज असल्याचे संस्थेने म्हटले आहे.

या निवेदनाद्वारे महिलांसाठी वित्त आयोग आणि सेस फंडातून स्वतंत्र आर्थिक तरतूद करावी, त्यांना स्वावलंबी करण्यासाठी व्यवसाय प्रशिक्षण द्यावे आणि त्यांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या सर्व संस्थांना एका व्यासपीठावर आणावे, अशा विविध मागण्या मांडण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, सामाजिक स्तरावर विधवा महिलांना सन्मान मिळावा यासाठी ग्रामपंचायतींमध्ये होणाऱ्या हळदीकुंकू व इतर धार्मिक कार्यक्रमांत त्यांना सहभागी करून घेण्याचे स्पष्ट आदेश प्रशासनाने काढावेत, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. तसेच बालसंगोपन योजनेचे पैसे महिलांना नियमित मिळतात की नाही, याची खातरजमा करून त्यात सुसूत्रता आणण्याची विनंतीही करण्यात आली.

यावेळी झालेल्या सविस्तर चर्चेत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत या प्रश्नांवर सक्रिय पावले उचलण्याचे आश्वासन दिले. तर जिल्हाधिकारी मनुज जिंदाल यांनी चक्रभेदी सोशल फौंडेशनच्या कार्याचे कौतुक करून प्रशासकीय सहकार्याचे संकेत दिले. संस्थेच्या वैदेही सावंत यांनी यावेळी आपले मत व्यक्त करताना सांगितले की, संस्था प्रशासनासोबत खांद्याला खांदा लावून काम करण्यास तयार असून या कार्यात प्रशासकीय पाठबळाची नितांत गरज आहे. या प्रसंगी संस्थेच्या संपदा राणा, मनिषा बामणे, दिपाली गावडे आणि रावसाहेब चौगुले उपस्थित होते.

Total Visitor Counter

3379494
Share This Article