GRAMIN SEARCH BANNER

ताम्हिणी घाटात पुन्हा अपघात; कार दरीत कोसळून चालकाचा मृत्यू

Gramin Varta
202 Views

रायगड : माणगाव–पुणे मार्गावरील ताम्हिणी घाट अपघातांचा सापळा ठरत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. शुक्रवारी या घाटात दोन वेगवेगळे अपघात घडले. पहाटे कार दरीत कोसळून चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर काही तासांनी प्रवासी बसला झालेल्या अपघातात सुमारे ५० प्रवासी जखमी झाले.

माणगाव–पुणे मार्गावरील ताम्हिणी घाटातील कोंडेथर गावाच्या हद्दीत शुक्रवारी पहाटे सुमारे चार वाजण्याच्या सुमारास एक कार नियंत्रण सुटून खोल दरीत कोसळली. या अपघातात कारचालकाचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अपघात नेमका कोणत्या ठिकाणी झाला याची माहिती ड्रोनच्या साह्याने घेण्यात आली. विशेष म्हणजे, याच ठिकाणी नोव्हेंबर महिन्यात पुण्याहून आलेल्या वाहनाला अपघात होऊन सहा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्या घटनेनंतरही येथे संरक्षक कठडे उभारण्यात न आल्याने प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

दरम्यान, याच ताम्हिणी घाटात शुक्रवारी सकाळी सुमारे अकरा वाजण्याच्या सुमारास आणखी एक मोठा अपघात घडला. पुणे जिल्ह्यातील भोसरी येथील सावंत आयबी ऑटोविंग प्रायव्हेट लिमिटेड शोरूममधील कर्मचारी दोन खाजगी बसमधून रायगड जिल्ह्यातील काशीद बीचकडे पर्यटनासाठी जात असताना कोंडेकर गावाच्या हद्दीतील एका अवघड वळणावर बसचा अपघात झाला. या अपघातात बसचे मोठे नुकसान झाले असून सुमारे ५० प्रवासी जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच माणगावचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांच्यासह पोलीस पथक आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. सर्व जखमींना उपचारासाठी माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दोन्ही अपघातांची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. ताम्हिणी घाटातील वारंवार घडणाऱ्या अपघातांमुळे हा मार्ग अधिकच धोकादायक बनत असून, तातडीने सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.

Total Visitor Counter

3073097
Share This Article