GRAMIN SEARCH BANNER

कोकणच्या विकासाला गती; जयगड खाडीवर ७५० कोटींचा भव्य पूल

Gramin Varta
202 Views

रेवस-रेड्डी सागरी महामार्गाचे काम युद्धपातळीवर

रत्नागिरी:- कोकण किनारपट्टीवरील प्रवास वेगवान करण्यासाठी आणि पर्यटनाला नवी झळाळी देण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने कंबर कसली आहे. रेवस-रेड्डी या महत्त्वाकांक्षी सागरी महामार्गावरील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असलेल्या ‘सांडेलवंगण-तवसाळ’ पुलाचे काम आता प्रत्यक्ष सुरू झाले असून, यामुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या दळणवळणात मोठी क्रांती होणार आहे.

सुमारे ७५० कोटी रुपये खर्चून उभारला जाणारा हा पूल अभियांत्रिकीचे एक उत्तम उदाहरण ठरेल. या पुलाची काही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. यामध्ये या पुलाची एकूण लांबी २.५ किलोमीटर असणार आहे. तर उंची खाडीच्या पाण्यापासून तब्बल ३५ मीटर उंच ठेवण्यात येणार आहे. जेणेकरून मोठ्या जहाजांच्या वाहतुकीला अडथळा येणार नाही. पुलाचा डोलारा पेलण्यासाठी एकूण ३३ पिलर (खांब) उभारले जाणार आहेत. मुख्य महामार्गाला जोडण्यासाठी दोन्ही बाजूंनी २.५ मीटरचे जोड रस्ते तयार केले जाणार आहेत.

या प्रकल्पासाठी प्रशासनाने अत्यंत वेगाने पावले उचलली आहेत. रत्नागिरी तालुक्यातील चाफेरी आणि सांडेलवंगण या दोन गावांमधील जमीन संपादित केली जात आहे. विशेष म्हणजे, भूसंपादनापोटी ३१ कोटी रुपयांचा निधी प्रशासनाकडे जमा झाला असून, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना त्याचे वितरणही सुरू झाले आहे. यामुळे कामात कोणताही तांत्रिक किंवा कायदेशीर अडथळा उरलेला नाही.

सध्या जयगड खाडी ओलांडण्यासाठी प्रवाशांना बोटीचा (फेरी) आधार घ्यावा लागतो किंवा मोठा वळसा घालून प्रवास करावा लागतो. मात्र, या पुलामुळे वेळेची बचत होणार आहे. रत्नागिरी आणि गुहागर हे दोन तालुके थेट जोडले जातील. रेवस-रेड्डी मार्ग पूर्ण झाल्यावर पर्यटकांना कोकणच्या निसर्गरम्य किनाऱ्यावरून गोवा गाठता येईल.
वाहतूक सुधारल्यामुळे स्थानिक व्यापार आणि रोजगाराला मोठ्या संधी उपलब्ध होतील.

सध्या ‘अरविंद टेक्नों’ या नामांकित कंपनीमार्फत तवसाळ बाजूकडून पुलाच्या कामाला सुरुवात झाली आहे. आगामी काळात हा पूल पूर्ण झाल्यावर कोकण किनारपट्टीवरील वाहतुकीचे संपूर्ण चित्र पालटणार आहे.

Total Visitor Counter

3386923
Share This Article