GRAMIN SEARCH BANNER

चिपळूण: बहादूर शेख नाका परिसरात पुन्हा अपघात; तरुण दुचाकीसह नाल्यात कोसळला

Gramin Varta
229 Views

चिपळूण (प्रतिनिधी):शहरातील अत्यंत वर्दळीच्या बहादूर शेख नाका ते मुतप्पन मंदिर गेट परिसरात अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. बुधवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास एका तरुणाची दुचाकी थेट रस्त्यालगतच्या नाल्यात कोसळल्याची घटना घडली. समोरून येणाऱ्या वाहनाची धडक चुकवण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला असून, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुण हा कडवई गावचा रहिवासी असून तो आपल्या गावी जात असताना अरुंद रस्त्यामुळे त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि तो बाईकसह नाल्यात फेकला गेला. सुदैवाने त्याला गंभीर दुखापत झाली नसली तरी या घटनेने परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पवार यांनी तत्परता दाखवत क्रेन पाचारण केली आणि नाल्यात अडकलेली दुचाकी व त्या तरुणाला सुखरूप बाहेर काढले. यावेळी घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. विशेष म्हणजे, याच ठिकाणी यापूर्वीही दोन गंभीर अपघात झाले असून एका तरुणाला कायमचे अपंगत्व स्वीकारावे लागले आहे. वारंवार घडणाऱ्या या दुर्घटनांमुळे स्थानिक रहिवासी आणि वाहनचालकांमध्ये प्रशासनाविरुद्ध प्रचंड संताप व्यक्त होत आहे.नागरिकांच्या मते, राष्ट्रीय महामार्गाशी संबंधित असलेला हा रस्ता समोरून अत्यंत अरुंद करण्यात आला आहे, ज्यामुळे दोन वाहने समोरासमोर आल्यास चालकाची मोठी कसरत होते. नॅशनल हायवे प्रशासन आणि संबंधित कंत्राटदाराच्या दुर्लक्षामुळे निष्पाप लोकांचे बळी जात असल्याचा आरोप सुबोध सावंत-देसाई व प्रकाश पवार यांच्यासह ग्रामस्थांनी केला आहे. प्रशासनाला जाग येण्यासाठी अजून किती बळी हवे आहेत, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.प्रस्तावित पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात रस्ता रुंदीकरण करणे, संरक्षक भिंत उभारणे, पुरेशी प्रकाशयोजना आणि इशारा फलक लावणे अत्यंत गरजेचे झाले आहे. या धोकादायक वळणावर तातडीने उपाययोजना न केल्यास भविष्यात मोठा अनर्थ घडण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. आता या अपघाताच्या मालिकेनंतर तरी हायवे प्रशासन ठोस पावले उचलणार का, याकडे संपूर्ण चिपळूणकरांचे लक्ष लागून राहिले आहे.

Total Visitor Counter

3388325
Share This Article