GRAMIN SEARCH BANNER

जयगड तिहेरी हत्याकांड: दोन पोलिसांची चौकशी सुरू

Gramin Varta
899 Views

रत्नागिरी: जयगड परिसरातील तिहेरी हत्याकांड प्रकरणी पोलीस प्रशासनाकडून आता आणखी दोन पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू झाली आहे. याआधीच या प्रकरणातील हलगर्जीपणाच्या आरोपांनंतर जयगड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांची बदली करण्यात आली होती. जर हे दोन कर्मचारी दोषी आढळले, तर त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाईल, असे संकेत पोलिसांनी दिले आहेत.

राकेश जंगम बेपत्ता प्रकरणात जयगड पोलिसांनी दाखवलेल्या निष्काळजीपणावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका होत होती. यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी पत्रकार परिषद घेऊन दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसारच, पहिली कारवाई म्हणून कुलदीप पाटील यांची बदली करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, ६ जून २०२४ रोजी राकेश जंगम याचा खून करून त्याचा मृतदेह आंबाघाट येथे फेकून देण्यात आला होता. या खुनाच्या प्रकरणात मुख्य आरोपी दुर्वास पाटील याने चौकशीदरम्यान राकेशची हत्या केल्याची कबुली दिली. दुर्वास पाटील याच्यासोबत या गुन्ह्यात विश्वास पवार आणि नीलेश भिंगार्डे यांचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे.

मृत राकेश जंगम हा दुर्वास पाटील यांच्या खंडाळा येथील बारमध्ये वेटर म्हणून काम करत होता. २१ जून २०२४ रोजी राकेशची आई जयगड पोलीस ठाण्यात राकेश बेपत्ता असल्याची तक्रार देण्यासाठी गेल्या होत्या. मात्र, संपूर्ण एक वर्षभर शोध घेऊनही जयगड पोलिसांना राकेशचा पत्ता लागला नाही. पोलिसांच्या या हलगर्जीपणामुळेच या प्रकरणाला अधिक गंभीर स्वरूप प्राप्त झाले. आता पोलीस या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करत असून, लवकरच पुढील कारवाई केली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Total Visitor Counter

2647817
Share This Article