GRAMIN SEARCH BANNER

दापोली बाजारपेठेत लागलेल्या भीषण आगीत पाच दुकाने जळून खाक; वैभव खेडेकर यांनी दिली घटनास्थळी भेट

दापोली: दापोली शहरातील मुख्य बाजारपेठेत शनिवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास भीषण आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली. या आगीच्या भक्ष्यस्थानी बिपिन कॉर्नर परिसरातील पाच दुकाने पडली असून, यामध्ये व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हॉटेल सन्मान समोरील बिपिन कॉर्नर परिसरात रात्री अचानक आग लागली. गजबजलेल्या भागात ही आग लागल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती. या आगीत मोबाईल शॉपी आणि ज्वेलरीसह पाच दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. आगीचे स्वरूप इतके रौद्र होते की, काही वेळातच दुकानांमधील माल जळून कोळसा झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र तोपर्यंत व्यापाऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले होते.

या भीषण दुर्घटनेची माहिती मिळताच भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी बाधित व्यापाऱ्यांशी आणि स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांचे सांत्वन केले. झालेल्या नुकसानीचा आढावा घेतल्यानंतर, पीडित व्यापाऱ्यांना शासनाकडून व प्रशासनाकडून शक्य ती सर्व मदत मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

याप्रसंगी भाजपा युवा मोर्चाचे रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस ॲड. मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर, राकेश माली, सर्वेश पवार यांच्यासह पक्षाचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. अचानक ओढवलेल्या या संकटामुळे दापोलीतील व्यापारी वर्गातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रशासनाकडून या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत, अशी मागणी आता स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

Total Visitor Counter

3468191
Share This Article