गुहागर (प्रतिनिधी) : तालुक्यातील कोतळूक येथील मोरी खचली असून डांबरीकरणातच खड्डा पडला असल्याने वाहनचालकांना पटकन समजत नसल्याने अपघात होण्याचे प्रकार घडत असून मोठी जीवितहानी झाली की संबंधित विभाग जागे होणार का? असा सवाल कोतळूक ग्रामपंचायत सदस्य सचिन ओक यांनी केला आहे.
याविषयी अधिक माहिती देताना सचिन ओक यांनी सांगितले की, अंजनवेल, रानवी शृंगारतळी आबलोली रत्नागिरी या राज्य मार्गाचा दर्जा असलेल्या मार्गावर शृंगारतळी आबलोली मार्गावरील कोतळूक येथील ही मोरी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये खचली होती. त्यावेळी आपण स्वतः सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभाग गुहागरकडे पाठपुरावा केल्याने संबंधित विभागाकडून तातडीने तात्पुरती डागडुजी करण्यात आली. त्यानंतर नवीन मोरी टाकण्याऐवजी जानेवारी २०२५ मध्ये फक्त डांबरीकरणाचा मुलामा करून संबंधित बांधकाम विभाग शांत बसले, त्यानंतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून या ठिकाणी नवीन मोरी टाकण्याचे भविष्याच्या दृष्टीने कसे महत्वाचे आहे हे वारंवार सांगितले असता संबंधित ठेकेदाराला नवीन मोरी टाकण्याविषयी सूचना करण्यात आली असून पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण होईल असे तोंडी आश्वासन देण्यात आले. याविषयी कोतळूक ग्रामपंचायतीने देखील लेखी पत्राद्वारे संबंधित विभागाला कळवून देखील संबंधित बांधकाम विभागाने या पत्राला केराची टोपली दाखवली आहे. याविषयी ज्या गांभीर्याने बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देणे आवश्यक होते ते न देता दुर्लक्ष करून ठेकेदाराला पाठीशी घातल्यानेच आजची परिस्थिती निर्माण झाली असून एखादी आपत्ती उद्भवली की प्रशासन जागे होणार काय? असा सवाल सचिन ओक यांनी केला असून आपत्ती व्यवस्थापन प्रमुख म्हणून तहसिलदार यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली आहे.
कोतळूक येथील मोरी खचली; बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

Leave a Comment