राजापूर / प्रतिनिधी
रत्नागिरी शाखेतील माजी शाखा व्यवस्थापकाकडून झालेल्या काही संशयास्पद व्यवहारांमुळे राजापूर अर्बन बँकेच्या विश्वासार्हतेवर काहीसा परिणाम झाला आणि ठेवींमध्ये तात्पुरती घट नोंदवली गेली. मात्र बँकेची एकूण आर्थिक स्थिती ठाम असून ठेवीदारांचा पैसा पूर्णपणे सुरक्षित असल्याची ग्वाही अध्यक्ष संजय ओगले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ओगले म्हणाले की, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे काटेकोर पालन करत बँकेचे कामकाज पारदर्शक आणि जबाबदार पद्धतीने सुरू आहे. १०४ वर्षांची उज्वल परंपरा लाभलेल्या या सहकारी संस्थेने सन २०२४-२५ मध्ये आव्हानात्मक परिस्थितीचा सामना केला. मार्च २०२५ मध्ये ठेवी ५२३ कोटींपर्यंत होत्या; परंतु अफवांमुळे सुमारे १०० कोटी रुपयांची घट झाली.
लेखापरीक्षणात सुरुवातीला ‘ड’ वर्ग मिळाल्यानंतर बँकेने सुधारणा करून सहकार आयुक्तांकडे अपील केले व आवश्यक पुरावे सादर केले. त्यानंतर सप्टेंबर २०२५ मध्ये बँकेला ‘ब’ वर्ग दर्जा देण्यात आला आहे.
अडचणींनंतरही संचालक मंडळ, अधिकारी-कर्मचारी आणि ठेवीदार-सदस्य यांच्या पाठबळामुळे बँक स्थिर स्थितीत असल्याचे ओगले यांनी स्पष्ट केले. “आपला विश्वास हीच आमची संपत्ती” या ब्रीदवाक्यानुसार बँक नव्या सेवा आणि योजनांद्वारे सभासदांचा विश्वास अधिक बळकट करत आहे.
गणेशोत्सव काळात सुरू केलेल्या ‘विघ्नहर्ता ठेव योजना’ला सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून आतापर्यंत ६ कोटी १३ लाख रुपये जमा झाले आहेत. यावर्षी लाभांश प्रस्ताव रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे पाठवण्यात आला असून त्यांच्या परवानगीशिवाय जाहीर करता येणार नसल्याची माहितीही ओगले यांनी दिली.
१०४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा २८ सप्टेंबर रोजी होणार असून त्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत अध्यक्ष एड. शशिकांत सुतार, उपाध्यक्ष विजय पाध्ये, संचालक जयंत अभ्यंकर, किशोर जाधव, विवेक गादीकर, प्रसाद मोहरकर, सौ. प्रतिभा रेडीज, तसेच अधिकारी रमेश काळे, लक्ष्मण म्हात्रे, रोहित सामंत आदी उपस्थित होते.
राजापूर अर्बन बँकेची आर्थिक स्थिती मजबूत; ठेवीदारांच्या रकमेची संपूर्ण सुरक्षा : अध्यक्ष संजय ओगले
