GRAMIN SEARCH BANNER

खेडमध्ये भरधाव दुचाकीने पादचाऱ्याला चिरडले, प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू

Gramin Search
6 Views

खेड : तालुक्यातील शिवतर रोडवर भडगाव उसरेवाडीजवळ १५ जून रोजी रात्री ९.१५ च्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात, दुचाकीच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या एका पादचारी व्यक्तीचा मुंबई येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दयानंद दत्ताराम चव्हाण (वय ५६, रा. भडगाव उसरेवाडी, ता. खेड) हे आपली मुलगी दिपाली दयानंद चव्हाण (वय ३१, रा. मुंब्रादेवी कॉलनी रोड दिवा, जि. ठाणे) यांच्यासोबत मुलाच्या शाळेची खरेदी करून आपल्या घरी पायी चालत जात होते. शिवतर रोडवर भडगाव उसरेवाडीच्या मागे, आयटीआय कॉलेजजवळ आले असता, अक्षय जाधव (रा. चाकाळे, ता. खेड) नावाच्या दुचाकीस्वाराने आपल्या ताब्यातील होंडा युनिकॉर्न (क्र. एम.एच.०८ ए.एफ १६२७) मोटारसायकल भरधाव वेगात, हयगईने व निष्काळजीपणे चालवून दयानंद चव्हाण यांना पाठीमागून जोरदार धडक दिली.

या धडकेत दयानंद चव्हाण यांच्या कमरेला, डोक्याला आणि शरीराच्या इतर भागांना गंभीर दुखापती झाल्या. त्यांना तातडीने उपचारासाठी एमजीएम हॉस्पिटल, मुंबई येथे दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान २२ जून रोजी सकाळी ९.१० वाजता त्यांचा मृत्यू झाला.

या अपघातात दुचाकीस्वार अक्षय जाधव हा देखील जखमी झाल्याचे वृत्त आहे. या प्रकरणी दिपाली दयानंद चव्हाण यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Total Visitor Counter

2648096
Share This Article