GRAMIN SEARCH BANNER

ब्रेकिंग : रत्नागिरी नगरपालिकेत उपनगराध्यक्ष आणि अभियंता भिडले; शौचालय घोटाळ्याच्या फाईलवरून पालिका वर्तुळात जोरदार राडा

Gramin Varta
466 Views

रत्नागिरी (प्रतिनिधी): रत्नागिरी नगर परिषदेत गुरुवारी सायंकाळी सत्ताधारी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यातील संघर्षाने टोक गाठले. शौचालय घोटाळ्याशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे मागण्यासाठी गेलेले उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर आणि बांधकाम अभियंता यतीराज जाधव यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली. अभियंता जाधव यांनी आपल्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा खळबळजनक आरोप तिवरेकर यांनी केला असून, या प्रकारामुळे पालिका वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

कागदपत्रांच्या मागणीवरून वादाची ठिणगी

मिळालेल्या माहितीनुसार, २०२१ मधील स्वच्छता अभियानांतर्गत झालेल्या शौचालयांच्या दुरुस्ती कामात मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या कामांच्या खर्चाचा हिशोब आणि निविदेनुसार कामांच्या तपशिलाची (बायफर्केशन) प्रत मागण्यासाठी उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर सायंकाळी ५ च्या सुमारास अभियंता रोहन डांगे यांच्या कक्षात गेले होते. आगामी सर्वसाधारण सभेत या घोटाळ्यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी ही माहिती आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या वेळी तिवरेकर डांगे यांच्याशी चर्चा करत होते, त्याच वेळी तिथून बाहेर पडणारे बांधकाम अभियंता यतीराज जाधव यांनी अचानक हस्तक्षेप केला आणि वादाला सुरुवात झाली.

शिवीगाळ आणि धमकीचा आरोप

या घटनेनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना समीर तिवरेकर यांनी गंभीर आरोप केले. “मी जाधव यांच्याशी बोलतही नव्हतो, तरीही त्यांनी पूर्वग्रहदूषितपणातून मला घाण भाषेत शिवीगाळ केली आणि धमकावले,” असे तिवरेकर यांनी स्पष्ट केले. नगरपालिकेत पारदर्शक कारभार व्हावा आणि घोटाळे समोर यावेत यासाठी आपण प्रयत्नशील असून, ज्यांनी भ्रष्टाचार केला आहे त्यांच्या मनात भीती असल्यानेच असा प्रकार घडला असावा, असेही त्यांनी नमूद केले. रत्नागिरीच्या राजकीय संस्कृतीला हे वर्तन शोभा देणारे नाही, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

सत्ताधारी नगरसेवकांकडून निषेध

ही घटना घडली तेव्हा नगरपालिकेचे कर्मचारी, शिवसेनेचे गटनेते बाळू साळवी, पाणी सभापती निमेश नायर आणि अन्य सहकारी नगरसेवक उपस्थित होते. महायुतीच्या सर्व नगरसेवकांनी या प्रकाराचा तीव्र निषेध केला आहे. रत्नागिरी नगरपालिकेचे वैभव परत मिळवून देण्यासाठी आणि प्रशासनातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे यावेळी तिवरेकर यांनी स्पष्ट केले. या घटनेमुळे आता सत्ताधारी गट आक्रमक झाला असून प्रशासकीय अधिकाऱ्यांविरुद्ध पवित्रा घेतला आहे.

अभियंत्याच्या निलंबनाची मागणी

या राड्याचे पडसाद आता आगामी सर्वसाधारण सभेत उमटणार आहेत. उपनगराध्यक्षांना झालेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे सत्ताधारी आणि प्रशासन यांच्यातील संघर्ष अधिकच पेटला आहे. येत्या सभेत यतीराज जाधव यांच्या निलंबनाचा अधिकृत प्रस्ताव मांडून त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी सर्व नगरसेवकांतर्फे केली जाणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. आता यावर नगरपालिका प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Total Visitor Counter

3199498
Share This Article