GRAMIN SEARCH BANNER

राजापूर: पाणीचोरीविरोधात पालिकेची धडक कारवाई; पाच पंप जप्त

Gramin Varta
162 Views

राजापूर – राजापूर शहरातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी राजापूर नगरपालिकेने पाणीचोरीविरोधात आक्रमक पवित्रा घेत धडक कारवाई सुरू केली आहे. मुख्य जलवाहिनीवर बेकायदेशीररीत्या पंप बसवून पाणीचोरी करणाऱ्यांविरोधात कारवाई करत पाच पंप जप्त करण्यात आले असल्याची माहिती पाणीपुरवठा सभापती सौरभ खडपे यांनी दिली.

शहरात जलवाहिन्यांद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्यात अडथळा निर्माण करणाऱ्या पाणीचोरीच्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी पालिकेने कठोर भूमिका घेतली आहे. यापूर्वीच पाणीचोरी करणाऱ्यांवर दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार आता प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. पालिकेच्या पथकाकडून शहरात सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येत असून, यामध्ये मुख्य जलवाहिन्यांवर बेकायदेशीर पंप बसवून पाणीचोरी करणाऱ्यांचा शोध घेण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान पाच ठिकाणी पंप आढळून आले असून ते तात्काळ जप्त करण्यात आले. वाढत्या उष्म्यामुळे जलसाठ्यावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन पालिकेने पाणीटंचाई टाळण्यासाठी उपाययोजना हाती घेतल्या आहेत. विंधन विहिरी, पारंपरिक विहिरी आणि तळी यांची साफसफाई सुरू करण्यात आली असून, आगामी काळात पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

Total Visitor Counter

3388768
Share This Article