मुंबई : कोकण रेल्वेच्या स्थापनेपूर्वी कोकणातील प्रवास हा वेळखाऊ, अवघड आणि कधी कधी धोकादायक प्रवास होता. परंतु कोकण रेल्वेच्या माध्यमातून कोकणातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे खुली झाली.
शेतमाल व मासळी बाजारपेठांपर्यंत पोहोचली, कोकणातील पर्यटन फुलले आणि स्थलांतरित कोकणवासीयांना आपल्याच मातीशी सहज संबंध ठेवता आला. पण आता ३५ वर्षांच्या यशोगाथेनंतर पुढील टप्पा हा दुहेरीकरणाचा आहे. त्यामुळे कोकण रेल्वे प्रशासनाने दुहेरीकरण करण्यावर भर द्यावा, अशी मागणी कोकणकरांनी कोकण रेल्वेकडे केली आहे.
कोकण रेल्वे ही कोलाड ते ठोकुर अशा ७३९ किमी अंतरापर्यंत आहे. त्यात रोहा ते वीर ४६.८ किमी रेल्वे मार्गाचे ऑगस्ट २०२१ रोजी दुहेरीकरण पूर्ण झाले. परंतु, गेली चार वर्षे दुहेरीकरणाला गती मिळाली नाही. त्यामुळे प्रवाशांना विलंबाचा फटका सहन करावा लागतो. कोकण रेल्वे एकेरी मार्गाची असल्याने, रेल्वेगाड्या वेळेत धावण्यास अडथळा झाला आहे. त्यामुळे कोकणवासीयांचा प्रवास वेगवान होण्यासाठी, दुहेरीकरण करणे आवश्यक झाले आहे. दुहेरीकरण फक्त विकासासाठी नाही तर सुरक्षेसाठी अत्यावश्यक आहे, असे प्रवाशांनी सांगितले.
बुधवारी झालेला ३५ वा वर्धापन दिन कोकण रेल्वेचा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम म्हणून शेवटचा ठरवून पुढील वर्षीपासून भारतीय रेल्वेचाच एक विभाग म्हणून साजरा व्हावा किंवा कोकण रेल्वेचे मध्य रेल्वे विभागात विलीनीकरण करावे, अशी मागणी कोकणवासीयांनी केली. तसेच कोकण रेल्वेवरील प्रवासी वाहतुकीसाठी ४० टक्के अधिभार रद्द करावा व कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारने विशेष निधीची तरतूद करावी. यामुळे लाखो प्रवाशांना दिलासा मिळेल व कोकणातील पर्यटन व व्यापाराला चालना मिळेल. तसेच, कोकणवासीयांना इतर भारतीयांप्रमाणेच समान वागणूक मिळेल, अशी मागणी करण्यात आली.
कोकण रेल्वेवरील पायाभूत सुविधा वाढीसाठी कोकण रेल्वेला मध्य रेल्वेशी जोडणे आवश्यक आहे. निधीअभावी दुहेरीकरणाचे काम रखडले आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी भरीव आर्थिक बळ असणे आवश्यक आहे. त्यासाठी कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण होणे गरजेचे आहे. कोकण रेल्वेचे दुहेरीकरण झाल्यास कोकण रेल्वेचा वक्तशीरपणा वाढेल. जादा रेल्वे धावतील. तसेच कोकण पट्ट्याचा विकास होईल. यासह प्रवाशांचा सुरक्षित आणि वेगवान प्रवास होईल. – अक्षय महापदी, सचिव, अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती
कोकण रेल्वेचे दुहेरीकरण मार्गी लावावे; कोकण रेल्वेच्या ३५ व्या वर्धापन दिनानिमित्त कोकणवासीयांची मागणी
