रत्नागिरी : ज्या विभागाकडे अर्ज प्रलंबित आहेत, ते तात्काळ मार्गी लावावेत. रत्नागिरी नगरपरिषदेने प्रलंबित तसेच नव्याने दाखल झालेल्या अर्जांबाबत काय कार्यवाही केली, त्याचा अहवाल शुक्रवार पर्यंत द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज लोकशाही दिन झाला. यावेळी अपर पोलीस अधिक्षक बाबुराव महामुनी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे, जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, सहायक आयुक्त दीपक घाटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह जाधव आदी उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्यासह क्षेत्रीय स्तरावरील उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी मागील प्रलंबित अर्जांचा आढावा घेतला. नव्याने दाखल अर्जांबाबत काय कार्यवाही केली याबाबतही संबंधित विभागाने अहवाल देण्याबाबत सांगितले. मागील प्रलंबित अर्जांची संबंधित विभागाने निर्गती करावी. रत्नागिरी नगरपरिषदेने तालुका भूमिअभिलेख विभागाशी समन्वय साधून आलेल्या अर्जावर तात्काळ कार्यवाही करावी. त्याबाबतचा अहवाल शुक्रवारपर्यंत सादर करावा, असे जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले.