GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी: निवळीत शॉक लागून मृत्यू प्रकरणी महावितरण जबाबदार, वायरमनवर गुन्हा

रत्नागिरी : तालुक्यातील निवळी-शिंदेवाडी येथे महावितरण कंपनीच्या तुटलेल्या विद्युत वाहिनीचा धक्का बसून दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना १७जुलै रोजी घडली होती. या दुर्घटनेनंतर रत्नागिरी विद्युत निरीक्षण विभागाच्या कार्यालयाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली होती. या अपघाताचा अहवाल या विभागाने सादर केला असून, महावितरणच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात झाला असल्याचा स्पष्ट उल्लेख केला आहे. प्राथमिक अहवालानुसार या दुर्घटनेबाबत महावितरण जबाबदार राहणार असल्याचे नमूद आहे. वायरमनच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. दिलीप भिकाजी मायंगडे ( रा. भोके, मटवाडी, ता.जि. रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या वायरमनचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निवळी, कुंभळवठार येथील रहिवासी शांता वासुदेव वाडकर (वय ६३, गृहिणी) यांनी या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, आरोपी दिलीप भिकाजी मायंगडे या वायरमनने विजेच्या खांबावरील तुटलेल्या तारेचा विद्युत प्रवाह बंद न करता ती तशीच चालू ठेवली. इतकेच नव्हे, तर तुटलेल्या तारेच्या ठिकाणी असलेली झुडपे तोडण्यासाठी स्वतः हजर न राहता, त्यांनी शांता वाडकर यांच्या बहीण विदुलता वासुदेव वाडकर यांना ‘गडी बघून’ झाडे तोडण्यास सांगितले. त्यानुसार, विदुलता वासुदेव वाडकर आणि चंद्रकांत यशवंत तांबे (रा. निवळी, शिंदेवाडी) हे दोघे वसंत सीताराम मुळ्ये यांच्या आंबा बागेतील शिंदेवाडीला जाणाऱ्या पायवाटेच्या बाजूला झाडे-झुडपे तोडत होते. त्याचवेळी त्यांना तुटलेल्या तारेचा जोरदार विद्युत शॉक लागला आणि त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

वायरमन दिलीप भिकाजी मायंगडे यांच्या निष्काळजीपणामुळे आणि हलगर्जीपणामुळेच विदुलता वासुदेव वाडकर आणि चंद्रकांत यशवंत तांबे यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा आरोप फिर्यादी शांता वाडकर यांनी केला आहे. या प्रकरणी दिलीप भिकाजी मायंगडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Total Visitor Counter

2455617
Share This Article