GRAMIN SEARCH BANNER

मनोज जरांगेंची 29 ऑगस्टला चलो मुंबईची हाक

मराठा समाजाच्या विजयाचा गुलाल उधळण्याचा निर्धार

जालना: मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पुन्हा एकदा आक्रमक झाले असून आता त्यांनी चलो मुंबईची हाक दिली आहे.

आगामी आंदोलन 29 ऑगस्टला मुंबईतच होणार आहे. हे आंदोलन निर्णायक ठरणार असून, मराठा समाजाच्या विजयाचा गुलाल उधळायचाच आहे, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला. मुंबईतील हे आंदोलन आता फक्त मागणीचं नाही, तर निर्णय घेण्यासाठीचं असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

जालन्यातील अंतरवाली सराटी येथे आज, रविवारी जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी राज्यव्यापी बैठक बोलावली होती. या बैठकीसाठी राज्यभरातून मराठा कार्यकर्ते अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले होते. या बैठकीत मराठा आरक्षणासह गेली दोन वर्षे मराठा समाजाला आंदोलन करून काय मिळालं? आता काय मिळवायचं? या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. तसेच 29 ऑगस्टच्या मुंबई आंदोलनाच्या नियोजनाबाबत देखील या बैठकीत चर्चा झाली. बैठकीदरम्यान ‘एक मराठा लाख मराठा’, ‘लढेंगे, जितेंगे, हम सब जरांगे’, ‘कोण आला रे कोण आला, मराठ्यांचा वाघ आला’ अशा घोषणाही देण्यात आल्या.

मराठ्यांची लाट काय असते, हे मुंबईत आल्यावर बघा, इथून 10 ते 12 लाख लोक निघाले पाहिजेत, पाऊस पाणी बघू नका. फक्त तुम्ही सर्व जण माझ्या मागे राहा, मी बघतोच की हे आरक्षण कसे देत नाहीत. 27 ऑगस्ट रोजी मुंबईकडे कूच करायचं आहे. फक्त माझ्यावर एवढ्या वेळेस विश्वास ठेवा, एक इंच सुद्धा मागे हटणार नाही. मराठ्यांनी आता हुशार व्हा, आपल्या बाजूने विजयाची चाहूल लागली आहे. त्यामुळे घरी थांबायचं नाही. तुमच्या ताकदीशिवाय कोणालाही विजय मिळवता येत नाही, आतापासून मुंबईला जाण्याच्या तयारी लागा, घरोघरी जाऊन सांगा, असं आवाहनही जरांगेंनी मराठा बांधवाना केलं आहे.

आंतरवलीतून 27 ऑगस्टला निघाल्यानंतर शहागड, पैठण, शेवगाव, पांढरीपूल, अहिल्यानगर, नेप्टी नाका मार्गे आळेफाटा, शिवनेरी दर्शन, माळशेज घाट, कल्याण, वाशी, चेंबूर, मंत्रालय असा मुंबईत जाण्याचा मार्ग असेल. याला पर्यायी मार्ग पैठण, गंगापूर, वैजापूर, येवला, नाशिक आणि मुंबई असा असणार आहे.

Total Visitor

0217970
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *