GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी पोलिसांची अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई; 181 किलो ड्रग्ज केले नष्ट

Gramin Varta
380 Views

रत्नागिरी : जिल्ह्यात अमली पदार्थांच्या विरोधात सुरू असलेल्या मोहिमेत रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने महत्त्वाची आणि निर्णायक कारवाई केली आहे. 2020 ते 2025 या कालावधीत विविध 65 गुन्ह्यांत जप्त करण्यात आलेला तब्बल 181 किलोपेक्षा अधिक अमली पदार्थांचा साठा पुणे जिल्ह्यातील रांजणगाव एमआयडीसी येथे शास्त्रशुद्ध पद्धतीने नष्ट करण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडण्यात आली.

पोलीस महासंचालकांच्या आदेशानुसार ‘एनडीपीएस’ कायद्यांतर्गत जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांच्या विल्हेवाटीसाठी रत्नागिरी जिल्ह्यात ‘ड्रग्ज डिस्पोजल समिती’ची स्थापना करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे असून, सदस्य म्हणून अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी आणि पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) राधिका फडके यांचा समावेश आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे आणि त्यांच्या पथकाने न्यायालयाची आवश्यक परवानगी घेऊन एकूण 181 किलो 141 ग्रॅम अमली पदार्थ नष्ट करण्याची प्रक्रिया पूर्ण केली. या साठ्यात 82 किलो 981 ग्रॅम गांजा, 97 किलो 899 ग्रॅम चरस, 252 ग्रॅम ब्राऊन शुगर (हेरॉईन) तसेच 9 ग्रॅम एमडी या अमली पदार्थांचा समावेश होता.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मान्यतेनंतर 26 डिसेंबर रोजी पुणे जिल्ह्यातील रांजणगाव एमआयडीसी येथील ‘महाराष्ट्र एनविरो पॉवर लिमिटेड’ या अधिकृत संस्थेमध्ये जाळण्याच्या प्रक्रियेद्वारे हा सर्व मुद्देमाल नष्ट करण्यात आला. या कारवाईमुळे विविध गुन्ह्यांतील जुना मुद्देमाल निकाली काढण्यात आला असून, अमली पदार्थ तस्करीविरोधात रत्नागिरी पोलीस दलाने आपली कठोर भूमिका पुन्हा अधोरेखित केली आहे. या कारवाईमुळे ड्रग्ज तस्करांना स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

Total Visitor Counter

3199509
Share This Article