रत्नागिरी: महाराष्ट्र पोलीस दलाचा ‘स्थापना दिन (रेझिंग डे)’ आणि ‘राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान’ यांचे औचित्य साधून रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आज पोलीस मुख्यालय येथील कवायत मैदानावर विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला रत्नागिरी शहरातील १२ विविध शाळांमधील सुमारे १,००० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त हजेरी लावली होती. कार्यक्रमाची सुरुवात रत्नागिरी पोलीस दलाच्या शानदार ध्वज संचलनाने झाली, ज्यामध्ये पोलीस बँड पथकाने सादर केलेल्या विविध धून उपस्थितांचे आकर्षण ठरल्या. या सोहळ्यात गोगटे जोगळेकर महाविद्यालय, मिस्त्री हायस्कूल, दामले विद्यालय, फाटक हायस्कूल, एम.डी. नाईक हायस्कूल, गोदुताई जांभेकर हायस्कूल, पटवर्धन हायस्कूल, शिर्के हायस्कूल, अ. के. देसाई हायस्कूल, जी.जी.पी.एस. हायस्कूल, जोशी हायस्कूल आणि पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
विद्यार्थ्यांसाठी हे आयोजन केवळ मनोरंजनात्मक नसून अत्यंत माहितीपूर्ण ठरले. यावेळी पोलीस दलाकडील अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची माहिती देऊन त्यांची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. विशेषतः क्यू.आर.टी. पथकाकडून सादर करण्यात आलेल्या दहशतवाद विरोधी प्रात्यक्षिकांनी विद्यार्थ्यांच्या अंगावर रोमांच उभे केले. रस्ता सुरक्षेचे महत्त्व पटवून देण्यासाठी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रस्ता सुरक्षा आणि वाहतूक नियमांवर आधारित एक प्रभावी पथनाट्य सादर केले. याशिवाय, पोलीस दलाच्या श्वान पथकाने विविध कौशल्यांची प्रात्यक्षिके दाखवून सर्वांची मने जिंकली. स्वसंरक्षणाची गरज लक्षात घेऊन जिल्हा तायक्वोंदो प्रशिक्षक प्रशांत मकवाना यांनी विद्यार्थ्यांना उपयुक्त मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिके दिली. या कार्यक्रमादरम्यान उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपहाराचे वाटपही करण्यात आले.
मैदानावरील कार्यक्रमांसोबतच पोलीस अधीक्षक कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान केले. त्याचप्रमाणे, रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मिरकरवाडा जेट्टी ते भगवती बंदर दरम्यान समुद्रात एक विशेष बोट रॅली काढण्यात आली. या रॅलीचा शुभारंभ रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या हस्ते झाला. या रॅलीत १५० मच्छिमार बांधवांनी आपल्या बोटींसह सहभाग नोंदवला. या संपूर्ण उपक्रमाचा मुख्य उद्देश नागरिक आणि विद्यार्थ्यांमध्ये पोलीस दलाविषयी विश्वासाचे नाते निर्माण करणे, रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करणे आणि युवकांमध्ये शिस्त व कायद्याची जाणीव वृद्धिंगत करणे हा होता.
या यशस्वी आयोजनासाठी अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर, पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) राधिका फडके, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील, जिल्हा विशेष शाखेचे अश्वनाथ खेडकर आणि इतर पोलीस अंमलदार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायबर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक स्मिता सुतार यांनी केले, तर संपूर्ण व्यवस्थापनाची जबाबदारी राखीव पोलीस निरीक्षक राजेंद्र कुळसंगे यांनी पार पाडली.





