GRAMIN SEARCH BANNER

मिऱ्या–नागपूर महामार्गावरील जेके फाईल्सजवळ निवारा शेड नाही, सुविधा नाहीत; रखरखत्या उन्हात प्रवाशांचा संताप

Gramin Varta
101 Views

अजय सावंत / रत्नागिरी : मिऱ्या–नागपूर महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात असल्याचा दावा केला जात असताना, रत्नागिरी शहरानजीकच्या जेके फाईल सर्कलमध्ये प्रवाशांना मात्र अक्षरशः वाऱ्यावर सोडल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. बसथांबा हलवला, पण पर्यायी निवारा शेड उभारण्याची तसदीही घेतली नाही, अशी प्रशासनाची बेफिकीर भूमिका आता प्रवाशांच्या जिवावर उठली आहे.

दररोज शेकडो एसटी प्रवासी रखरखत्या उन्हात ताटकळत उभे राहतात. डोक्यावर छप्पर नाही, पिण्याच्या पाण्याची सोय नाही, अशा अमानुष परिस्थितीत ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुले त्रस्त झाली आहेत. उन्हाच्या तीव्रतेमुळे उष्माघाताचा धोका वाढला असून, जीव मुठीत धरून लोक बसची वाट पाहत आहेत. झाडांची कत्तल करून सावलीही हिरावून घेतल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली आहे.

महत्त्वाचा वर्दळीचा थांबा असलेल्या या ठिकाणी गेली दोन वर्षे कामाचा संथ गतीने सुरू असलेला खेळ सुरूच आहे. साळवी स्टॉप ते नर्मदा सिमेंट कंपनी दरम्यान रस्त्याचे काही काम पूर्ण झाले असले तरी प्रवाशांसाठी आवश्यक सुविधा अजूनही कागदावरच आहेत. “काम पूर्णतेकडे” असल्याच्या घोषणा आणि प्रत्यक्ष स्थिती यात प्रचंड तफावत दिसून येत आहे.

यात भर म्हणजे सर्विस रोड अपूर्ण असल्याने जेके फाईल परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. उडणारी धूळ, वाहतूक कोंडी आणि उभे राहायलाही जागा नसलेली परिस्थिती यामुळे प्रवासी आणि स्थानिक नागरिकांचा जीव अक्षरशः हैराण झाला आहे. आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत असतानाही संबंधित यंत्रणा मात्र ढिम्म असल्याचे चित्र आहे.

“आता तरी जागे व्हा!” असा संतप्त सवाल नागरिक करत असून, तातडीने निवारा शेड, पिण्याचे पाणी आणि सुरक्षित थांबा उपलब्ध करून देण्याची जोरदार मागणी होत आहे. अन्यथा, या उदासीनतेविरोधात प्रवाशांचा संताप रस्त्यावर उतरण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत.

Total Visitor Counter

3361065
Share This Article