महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित विविध कार्यक्रम उत्साहात
संगमेश्वर : तालुक्यातील वांद्री कुणबीवाडी येथे १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त दिवसभर धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली.
दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, तर सायंकाळी महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम पार पडला. रात्री बहुरंगी नमनाने वातावरण रंगतदार झाले. त्यानंतर सादर करण्यात आलेल्या ‘अखेरची अंगाई’ या सामाजिक दोन अंकी नाटकाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कलाकारांच्या प्रभावी अभिनयाला प्रेक्षकांनी टाळ्या-शिट्यांच्या गजरात दाद देत भरभरून प्रतिसाद दिला.
दरम्यान, सायंकाळी स्मशानभूमी रस्ता उद्घाटन सोहळाही पार पडला. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. बोलताना जिल्हा परिषद सदस्या माधवी गीते यांनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देत गावातील एकोपा आणि उभरत्या कलाकारांचे विशेष कौतुक केले.
या कार्यक्रमास संगमेश्वर पंचायत समिती सभापती शर्वरी वेल्ये, जिल्हा परिषद सदस्या माधवी गीते, पंचायत समिती सदस्य सुहास मायंगडे, उप जिल्हाप्रमुख राजेश मुकादम, उप तालुका प्रमुख संजय खातू, विभागप्रमुख आतिश पाटणे, सरपंच दीपक किंजळे, ग्रामपंचायत सदस्य सुनील सालीम, पूजा शिंदे, कुरधुंडा माजी सरपंच जमुरत अल्जी, तैमूर अल्जी, श्री. गीते, कानरकोंडचे शाखाप्रमुख, माजी सरपंच दत्ताराम कानर, बाबू गांधी, जिल्हा परिषद आदर्श शाळा वांद्रीचे मुख्याध्यापक मुळ्ये, गावकर मंगेश सालीम, सुभाष सालीम, दत्ताराम सालीम, विराज सालीम, लक्ष्मण शिगवण, सुरेश सनगरे, लक्ष्मण पाताडे, विश्वनाथ मांजरेकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कानरकोंड गावचे सुपुत्र व पदवीधर शिक्षक विलास कानर यांनी आपल्या ओघवत्या शैलीत केले.
रात्रीच्या कार्यक्रमाची सुरुवात नमनाने झाली. त्यानंतर सचिन फुटक लिखित व दत्ताराम मांजरेकर दिग्दर्शित ‘अखेरची अंगाई’ या हृदयस्पर्शी नाटकाचे सादरीकरण करण्यात आले. दोन प्रेमी युगुलांच्या जीवनातील संघर्ष, त्यांच्या भावनांची तगमग आणि नियतीने खेळलेली क्रूर थट्टा यांचे प्रभावी चित्रण नाटकातून उभे करण्यात आले. कलाकारांच्या भावनिक अभिनयामुळे प्रेक्षक भारावून गेले आणि अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या या नाटकाने उपस्थितांची मने जिंकत विशेष दाद मिळवली.







