GRAMIN SEARCH BANNER

लांज्यात शिकारीसाठी टपलेल्या दोघांना पोलिसांनीच टिपले; बंदूक आणि जिवंत काडतुसांसह दोन शिकारी अटकेत

लांजा:  लांजा शहरातील देवराई परिसरात वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी बंदूक घेऊन टपून बसलेल्या दोन शिकाऱ्यांना लांजा पोलिसांनी बुधवारी दुपारी मोठ्या शिताफीने अटक केली. या कारवाईत पोलिसांनी एक बंदूक आणि तीन जिवंत काडतुसे हस्तगत केली असून, स्वतः शिकार करण्यासाठी दबा धरून बसलेले हे संशयित पोलिसांच्याच जाळ्यात अडकले. अटक करण्यात आलेल्या संशयितांमध्ये अरुण नारायण चौगुले (वय ४६, रा. भडे पिंपळवाडी) आणि शैलेश दिलीप मेस्त्री (वय ३३, रा. इसवली सुतारवाडी) यांचा समावेश आहे.

शहरातील देवराई येथील गोपाळकृष्ण मंदिराजवळ असलेल्या नदीच्या पलीकडे झुडपात दोन व्यक्ती शिकारीच्या उद्देशाने लपल्याची खात्रीशीर माहिती बुधवारी लांजा पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक अमोद सरंगले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र रेवणे, कॉन्स्टेबल सुयोग वाडकर, नितेश राणे आणि चालक नाना डोलरेकर यांनी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी जाऊन सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच संशयितांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांना घेराव घालून ताब्यात घेतले.

या दोन्ही आरोपींकडून १२ बोअरची बंदूक आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरवस्तीत आणि दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली आहे. या शिकाऱ्यांना बाहेरच्या गावातून कुणी शिकारीसाठी बोलावले होते का किंवा त्यांच्यासोबत आणखी कुणी साथीदार होते का, याचा सखोल तपास पोलीस उपनिरीक्षक अमोद सरंगले करत आहेत. पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे वन्य प्राण्यांची संभाव्य शिकार टळली असून शिकारी टोळ्यांचे धाबे दणाणले आहेत.

Total Visitor Counter

3485490
Share This Article