चिपळूण : काविळतळी येथे किरकोळ वादातून पतीकडून पत्नीला अमानुष मारहाण

saurabhsalvi26@gmail.com
1 Min Read

चिपळूण: येथील काविळतळी भागातील कोयना बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या एका ३२ वर्षीय पतीने आपल्या पत्नीला गोड बोलून घरी बोलावून घेत अमानुष मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी चिपळूण पोलीस स्थानकात आरोपी अजमल अस्लम कडवैकर (रा. चिपळूण) याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१ (२) व (३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी निशात अजमल कडवैकर (वय ३३) या सध्या उक्ताड येथे वास्तव्यास आहेत. २० एप्रिल २०२६ रोजी रात्री ११.१५ वाजण्याच्या सुमारास आरोपी अजमल हा फिर्यादी राहत असलेल्या घरी गेला. “मला तुझ्याशी काहीतरी बोलायचे आहे,” असे गोड बोलून त्याने फिर्यादीला आपल्या काविळतळी येथील सासरी नेले. तिथे गेल्यावर आरोपीने किरकोळ कारणावरून वाद उकरून काढत फिर्यादीला हाताच्या थापटाने मारहाण व शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी फिर्यादी तिथून निघून जाऊ लागल्या असता, आरोपीने त्यांना ओढून त्यांचे डोके दोन्ही हाताने पकडले आणि त्यांच्या दोन्ही गालावर तसेच उजव्या हातावर जोरात चावा घेतला.

या झटापटीत आरोपीच्या हातातील घड्याळ फिर्यादीच्या डाव्या डोळ्याखाली लागल्याने त्यांना इजा झाली आहे. या मारहाणीनंतर जखमी निशात कडवैकर यांनी २१ एप्रिल रोजी दुपारी चिपळूण पोलीस स्थानकात धाव घेऊन पतीविरुद्ध तक्रार नोंदवली. घरगुती वादातून घडलेल्या या हिंसक प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *