रत्नागिरी: शहरातील गीता भवन जयस्तंभ येथील एस.टी. स्टॉपसमोर जुन्या वादातून एका तरुणावर लाकडी हॉकीस्टिकने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात आरोपी गणेश दत्ताराम महाडिक (रा. मारुती मंदिर, रत्नागिरी) याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम ११८(१), ३५१(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अभिषेक शशिकांत रहाटे (वय ३४, रा. तेली आळी, रत्नागिरी) हे २० एप्रिल २०२६ रोजी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास जयस्तंभ परिसरात उभे होते. यावेळी आरोपी गणेश महाडिक हा आपल्या ईटीओस कारने (क्रमांक एम.एच. ०२ सी.पी. २७३६) तिथे आला. आरोपीच्या पत्नीसोबत असलेल्या प्रेमसंबंधांच्या कारणावरून आणि न्यायालयात सुरू असलेल्या घटस्फोटाच्या दाव्याच्या रागातून आरोपीने फिर्यादीला गाठले. “तू माझ्या बायकोला फिरायला घेऊन जातोस, तू तिच्याशी लग्न कसं करतोस तेच बघतो,” अशी धमकी देत आरोपीने अभिषेक रहाटे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
फिर्यादीने शिवीगाळ करण्यास विरोध केला असता, आरोपीने आपल्या गाडीतून लाकडी हॉकीस्टिक काढून अभिषेक यांच्यावर जोरदार प्रहार केले. या हल्ल्यात अभिषेक रहाटे यांच्या डोक्याला, गालावर, ओठांवर आणि दातांवर गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. जखमी अभिषेक यांनी २१ एप्रिल रोजी पहाटे पोलीस स्थानकात धाव घेत तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस अंमलदार करत आहेत.





