संगमेश्वर: मुंबई-गोवा महामार्गावरील तळेकांटे येथे भरदिवसा एका भलेमोठ्या गवा रेड्याने महामार्गावरच दर्शन दिल्याने वाहनचालकांमध्ये एकच खळबळ उडाली. दुपारी भर रस्त्यात अचानक समोर आलेल्या या वन्यप्राण्यामुळे एका दुचाकीस्वाराची तर अक्षरशः भंबेरी उडाली होती. सुदैवाने, कोणतीही हानी न पोचवता हा गवा रेडा थोड्या वेळाने नदीच्या पात्रात निघून गेला, मात्र या घटनेमुळे या मार्गावरील वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारच्या सुमारास तळेकांटे गावाजवळ मुंबई-गोवा महामार्गावर एक विशाल गवा रेडा अचानक अवतरला. रस्त्याच्या मधोमध येऊन तो काही काळ थांबला. याचवेळी एक दुचाकीस्वार आपल्या दुचाकीवरून येत असताना त्याच्या अगदी समोरच हा गवा रेडा येऊन उभा राहिला. इतक्या मोठ्या आणि शक्तिशाली वन्यप्राण्याला अचानक समोर पाहून दुचाकीस्वाराची गाळण उडाली. त्याला क्षणभर काय करावे हेच सुचेना.
मात्र, प्रसंगावधान राखत त्याने स्वतःला सावरले आणि या अनपेक्षित पाहुण्याला आपल्या कॅमेरात कैद केले. काही मिनिटे महामार्गावर थांबल्यानंतर हा गवा रेडा हळूहळू महामार्ग ओलांडून जवळच्या बाव नदीच्या पात्रात शिरला आणि दृष्टीआड झाला.
भरदिवसा, आणि तेही वर्दळीच्या मुंबई-गोवा महामार्गावर गवा रेड्याचे असे थेट दर्शन होणे ही अत्यंत दुर्मिळ घटना मानली जात आहे. सहसा गवा रेडा मानवी वस्ती किंवा वर्दळीच्या ठिकाणांपासून दूर राहणे पसंत करतात. त्यामुळे या घटनेने वन्यजीव अभ्यासकांनाही आश्चर्य वाटले आहे.
या घटनेमुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांमध्ये मात्र भीतीचे सावट पसरले आहे. असे वन्यप्राणी अचानक रस्त्यावर आल्यास अपघाताची शक्यता वाढते. वन विभागाने यावर तातडीने लक्ष देऊन अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी आता वाहनचालकांकडून केली जात आहे.