रत्नागिरी: तालुक्यातील हातखंबा करवतीची येथील एका काजूच्या बागेत शिरगाव रोड, बाणखिंड येथील उदय वासुदेव सागवेकर (वय ५४) यांचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उदय सागवेकर हे २० एप्रिल रोजी सकाळी आपल्या ज्युपिटर दुचाकीवरून घराबाहेर पडले होते. मात्र, दीर्घकाळ उलटूनही ते घरी न परतल्याने आणि त्यांचा फोन लागत नसल्याने कुटुंबीयांनी त्यांची शोधमोहीम सुरू केली होती. अखेर पोलिसांच्या मदतीने मोबाईल लोकेशनचा मागोवा घेतला असता, ते हातखंबा परिसरातील एका काजूच्या बागेत असल्याचे निष्पन्न झाले.
नातेवाईकांनी तातडीने त्या ठिकाणी धाव घेतली असता सागवेकर हे जमिनीवर निपचित पडलेले आढळले. त्यांना तात्काळ पाली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या घटनेमुळे सागवेकर कुटुंबावर शोककळा पसरली असून पोलीस या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास करत आहेत.
हातखंबा येथील काजूच्या बागेत शिरगावच्या प्रौढाचा मृत्यू






