GRAMIN SEARCH BANNER

दापोलीच्या निषीध आमडस्करची खो-खो स्पर्धेत चमकदार कामगिरी; ‘विनय स्फोट नालासोपारा’ संघ ठरला विजेता

Gramin Varta
3 Views

दापोली : स्वराज्य ग्रुप, वसई यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रथम वर्षीय खो-खो स्पर्धेत दापोली तालुक्यातील आंबवली बुद्रुकच्या सुपुत्राने आपल्या खेळाची विशेष छाप पाडली आहे. दिनांक ६ व ७ जून रोजी वसई येथे उत्साहात पार पडलेल्या या स्पर्धेत ‘विनय स्फोट नालासोपारा’ संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांक पटकावला आणि विजेतेपदावर आपले नाव कोरले.

या विजेत्या संघामध्ये दापोली तालुक्यातील आंबवली बुद्रुक (पोस्ट – केळशी) येथील कु. निषीध आमडस्कर याचा समावेश होता. संपूर्ण स्पर्धेदरम्यान निषीधने अत्यंत चपळ, आक्रमक आणि प्रभावी खेळाचे प्रदर्शन करत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. त्याच्या या उत्कृष्ट खेळामुळे दापोली तालुक्याच्या क्रीडा क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

कु. निषीध हा आंबवली बुद्रुक येथील श्री काळेश्वरी क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सचिन आमडस्कर यांचा सुपुत्र आहे. त्याच्या या घवघवीत यशामुळे आंबवली बुद्रुक आणि केळशी परिसरासह संपूर्ण दापोली तालुक्यात सध्या आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. निषीधच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल श्री काळेश्वरी क्रीडा मंडळ, आंबवली बुद्रुक यांच्या वतीने त्याचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले असून, त्याच्या भविष्यातील क्रीडा कारकिर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. निषीधच्या या यशातून प्रेरणा घेत ग्रामीण भागातील अन्य खेळाडूंनीही राज्य व राष्ट्रीय स्तरावर यश मिळवून आपल्या गावाचे आणि तालुक्याचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा क्रीडाप्रेमींकडून व्यक्त होत आहे.

Total Visitor Counter

3484342
Share This Article