GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरीत केळीच्या बहाण्याने महिला विक्रेतीला लुटले; भरबाजारात टोळीचा ४० हजारांवर डल्ला

रत्नागिरी: रत्नागिरी शहराच्या गजबजलेल्या मुख्य बाजारपेठेत शुक्रवारी सायंकाळी चोरीची एक धक्कादायक घटना घडली. ग्राहकाचा वेश धारण करून आलेल्या महिला चोरट्यांच्या टोळीने एका महिला विक्रेत्याला बोलण्यात गुंतवून तिची ४० हजार रुपयांची रोकड असलेली पर्स अत्यंत चलाखीने लंपास केली. या प्रकारामुळे विठ्ठल मंदिर परिसरातील व्यापारी आणि नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या तपशिलानुसार, शुक्रवारी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास काही संशयित महिला बाजारपेठेत खरेदीचा बहाणा करत फिरत होत्या. त्यांनी केळी विकणाऱ्या एका महिलेकडे जात केळीचा दर विचारला. विक्रेत्याने ८० रुपये डझन असा दर सांगताच, या महिलांनी जाणीवपूर्वक भावतोल करत हुज्जत घालण्यास सुरुवात केली. यातील एक महिला विक्रेत्याचे लक्ष विचलित करत असतानाच, इतर महिलांनी आजूबाजूला गर्दीचा बनाव केला. याच संधीचा फायदा घेत टोळीतील एका मुलीने विक्रेत्याच्या शेजारी ठेवलेली पर्स लंपास केली. आपली पर्स गायब झाल्याचे लक्षात येताच विक्रेत्याने आरडाओरड केली, मात्र गर्दीचा फायदा घेत ही टोळी क्षणात पसार झाली होती.

चोरी गेलेल्या पर्समध्ये विक्रेत्याने पिग्मी खात्यातून काढलेली ४० हजार रुपयांची रोकड होती. धक्कादायक बाब म्हणजे, याच सुमारास परिसरातील दुसऱ्या एका फळ विक्रेत्या महिलेकडूनही एका महिलेने एक किलो काजूगर लंपास केल्याचे समोर आले आहे. या सलग घटनांमुळे ही टोळी बाजारपेठेत वेगवेगळ्या ठिकाणी सक्रिय असल्याचे स्पष्ट होत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास यंत्रणा राबवली असून आरोपींचा शोध घेतला जात आहे. बाजारपेठेत पोलिसांची गस्त वाढवावी अशी मागणी आता जोर धरत असून, अनोळखी व्यक्तींशी आर्थिक व्यवहार करताना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Total Visitor Counter

3485055
Share This Article