देवरुख: आंबा घाटातील दरोड्याप्रकरणी देवरूख पोलीसांनी शुक्रवारी दोघांच्या मुसक्या आवळल्यानंतर शेवटच्या म्हणजे आठव्या आरोपीलाही पोलीसांनी शनिवारी अटक केली आहे. त्यामुळे या दरोड्याप्रकरणी पोलीसांनी सर्व आरोपींना गजाआड केले आहे.
संतोष बाळू गोसावी (वय-३८, रा. टिआरपी, रत्नागिरी असे गजाआड केलेल्या शेवटच्या आरोपीचे नाव आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी येथील प्रथमेश तानाजी दळवी हे बुधवारी सायंकाळी रत्नागिरीतील वेतोशी येथून आपल्या बोलेरो गाडीत म्हैस घेऊन कोल्हापूरच्या दिशेने जात होते. रात्री ८.३० सुमारास आंबा घाटातील दख्खन येथे पांडुरंगा लिहिलेली थार गाडी आणि भारत सरकारचा लोगो लावलेल्या इनोव्हा गाडीतून आलेल्या आठ जणांनी दळवी यांची गाडी अडवली. आरोपींनी त्यांना गाडीतून खाली ओढून बेदम मारहाण केली आणि चाकूचा धाक दाखवत जबरदस्तीने इनोव्हा गाडीत कोंबले. तेथून त्यांना साखरपा येथील गंद्रे पेट्रोल पंपावर नेण्यात आले.
तिथे आरोपींनी ५० हजार रुपयांची मागणी केली आणि दळवी यांच्या गाडीतील केबिनमध्ये ठेवलेले २५ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. ‘जर पोलिसांत तक्रार केली तर याद राख,’ अशी धमकी देऊन आरोपी पसार झाले होते. त्यानंतर देवरूख पोलीसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पाच आरोपींना तात्काळ अटक केली होती. त्यानंतर शुक्रवारी दोन आरोपींना अटक केली होती. आता उर्वरित एका आरोपीलाही पोलीसांनी शनिवारी ताब्यात घेवून अटक केली आहे. संतोष बाळू गोसावी असे त्याचे नाव असून त्याला न्यायालयापुढे हजर केले असता ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
आंबा घाट दरोडा : आठव्या आरोपीला देवरूख पोलीसांनी केले गजाआड







