GRAMIN SEARCH BANNER

पवन तलाव मैदानाला आंतरराष्ट्रीय दर्जा देण्याचा संकल्प; डे-नाईट स्पर्धांसाठी विशेष सुविधा उभारणार

Gramin Varta
24 Views

आमदार शेखर निकम यांची ग्वाही; राज्यस्तरीय आमदार चषक लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे थाटात उद्घाटन

चिपळूण : शहरातील ऐतिहासिक पवन तलाव मैदान हे खऱ्या अर्थाने चिपळूण शहराचा दागिना असून या मैदानाचा सर्वांगीण विकास करून ते अधिक सुसज्ज करण्यावर आगामी तीन वर्षांत विशेष भर दिला जाणार आहे. तसेच येथे डे-नाईट क्रिकेट स्पर्धा आयोजित करता याव्यात यासाठी आधुनिक प्रकाशयोजना उभारण्याबाबत तांत्रिक बाबींचा अभ्यास केला जाणार असून विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान उभे करण्याचा मानस असल्याची माहिती आमदार शेखर निकम यांनी दिली.

चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या वतीने शहरातील पवन तलाव मैदानावर आयोजित ‘आमदार चषक’ भव्य सिझन बॉल क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला असोसिएशनचे अध्यक्ष दशरथ दाभोळकर यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी सांगितले की, चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनतर्फे लेदर बॉल क्रिकेटला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सलग तीन वर्षे राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. प्रशिक्षक उदय काणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट खेळाडू घडत असून स्पर्धांमधूनही खेळाडूंना व्यासपीठ मिळत आहे. आज चिपळूणमधील खेळाडू राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवत आहेत. पुढील वर्षी डे-नाईट सीजन बॉल स्पर्धा घेण्यासाठी मैदानावर वीज सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी त्यांनी आमदार शेखर निकम यांच्याकडे केली.

यावेळी रणजीपटू सुनील मोरे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, चिपळूणमध्ये उत्कृष्ट पद्धतीने मैदान तयार झाले असून आमदार शेखर निकम चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनला सिझन बॉल क्रिकेटसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या सुविधांचा खेळाडूंनी फायदा घ्यावा, असे त्यांनी आवाहन केले.

नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनला सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

या कार्यक्रमाला क्रिकेटमधील नामवंत प्रशिक्षक सचिन कोळी, चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष दशरथ दाभोळकर, राष्ट्रवादीचे नेते जयंद्रथशेठ खताते, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मिलिंद कापडी, सभापती सूर्यकांत घेतले, शिवसेनेच्या महिला शहरप्रमुख प्राजक्ता टकले, नगरसेवक संजय गोताड, डॉ. अभिजीत सावंत, रियाज खेरटकर, दिनू माटे, सचिन भोसले, सम्राट भोसले आदींसह असोसिएशनचे उपाध्यक्ष अनिरुद्ध निकम, सचिव राजेश सुतार, समालोचक सचिन कुलकर्णी, सुनील रेडीज, योगेश बांडागळे, सुयोग चव्हाण, विनीत देवधर, संदेश गोरिवले, पंच गोट्या भोसले, उदय काणेकर, दादा लकडे, साहिल कदम, प्रसाद सागवेकर, सलीम पालोजी, बाबल्या जाधव आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहिद खेरटकर यांनी केले.

दरम्यान, ‘आमदार चषक’ राज्यस्तरीय सीजन बॉल क्रिकेट स्पर्धेचा समारोप १९ एप्रिल रोजी होणार असल्याची माहिती अध्यक्ष दशरथ दाभोळकर यांनी दिली.

Total Visitor Counter

3287177
Share This Article