GRAMIN SEARCH BANNER

ब्रेकिंग: दापोलीत लाचखोर महिला तलाठी एसीबीच्या जाळ्यात; ७/१२ उताऱ्यावर नाव नोंदवण्यासाठी १० हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले

दापोली: चिपळूणमधील पोलीस लाचखोरीचे प्रकरण ताजे असतानाच आता दापोलीत एका महिला महसूल अधिकाऱ्याने लाच स्वीकारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. कोणतेही शासकीय काम दिल्या-घेतल्याशिवाय होत नाही, हा सर्वसामान्यांचा समज प्रत्यक्ष कृतीतून खरा ठरवणाऱ्या दापोली तालुक्यातील साझा नानटे येथील महिला ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) श्रद्धा बालाजी बंडे (वय ३०) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे.

तक्रारदार आणि त्यांच्या मित्रांनी मौजे तेरे वायंगणी येथे एकत्रित खरेदीखताद्वारे ७८ गुंठे जमीन खरेदी केली होती. या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर फेरफार नोंद करून नावे चढवण्यासाठी तक्रारदाराने १२ फेब्रुवारी २०२६ रोजी तलाठी श्रद्धा बंडे यांची भेट घेतली असता, त्यांनी १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यानंतर २४ फेब्रुवारी रोजी तहसीलदार कार्यालयात पुन्हा भेट झाली असता, मंजूर फेरफार आणि सातबाराची प्रत देण्यासाठी बंडे यांनी लाचेच्या मागणीचा पुनरुच्चार केला. सततच्या या लाच मागणीला कंटाळून तक्रारदाराने रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली. या तक्रारीची शहानिशा करून आज २५ फेब्रुवारी २०२६ रोजी महसूल विभागात सापळा रचण्यात आला.

यावेळी श्रद्धा बंडे यांनी पंचासमक्ष १० हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे परीक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रत्नागिरीचे पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील व त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. सध्या या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून, लाचखोरीच्या या घटनेत महिला अधिकारीही मागे नसल्याचे पाहून संताप व्यक्त होत आहे.

Total Visitor Counter

3471954
Share This Article