GRAMIN SEARCH BANNER

चिपळूण: बौद्धवाडी येथे अंडरपासच्या मागणीसाठी नगराध्यक्ष रस्त्यावर; काम रोखले

Gramin Varta
138 Views

चिपळूण : चिपळूण शहरातून जाणाऱ्या मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या वेगात सुरू आहे. मात्र शहरातील दीपक हॉटेलसमोरील बौद्धवाडी परिसरात अंडरपास देण्यात यावा, या मागणीसाठी आज बुधवारी नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी आपल्या सहकाऱ्यांसह थेट घटनास्थळी जाऊन महामार्गाचे येथील काम बंद पाडले.

गेल्या सहा महिन्यांपासून या ठिकाणी अंडरपास करावा, अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. वाशिष्ठी नदीवरील पूल युनायटेड हायस्कूलच्या थोडे पुढे खाली उतरत असून तो तसाच पुढे आणून दीपक हॉटेलसमोरील बौद्धवाडी येथे अंडरपास देण्यात यावा, तसेच पाग नाका परिसरात उड्डाणपूल करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांची आहे.

नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी शिवसेना शहरप्रमुख म्हणून हा विषय सहा महिन्यांपूर्वी पालकमंत्री उदय सामंत यांच्यापर्यंत पोहोचवला होता. यासोबतच सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडेही अंडरपासचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. मात्र मागणी प्रलंबित असतानाच या ठिकाणी महामार्गाच्या कामाला सुरुवात झाल्याचे लक्षात येताच नगराध्यक्ष सकपाळ यांनी तीव्र भूमिका घेतली.

“या ठिकाणी अंडरपास मंजूर होईपर्यंत कोणतेही काम करू देणार नाही,” असा इशारा देत त्यांनी सहकाऱ्यांसह काम बंद पाडले. मुख्याधिकारी विशाल भोसले, महामार्ग विभागाचे अभियंता, चेतक कंपनीचे जयंती हे या वेळी उपस्थित होते. या वेळी बबलू रजपूत, धनाजी जाधव, निशांत जंगम, सुनील सकपाळ, महेश सकपाळ, राजेंद्र जाधव, महेंद्र जाधव, मंगेश जाधव, तेजस सकपाळ, पवन सकपाळ, उत्तम जाधव, अरुण जाधव, अशोक सकपाळ आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या घटनेमुळे महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाबाबत पुन्हा एकदा वाद निर्माण झाला असून प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Total Visitor Counter

3215372
Share This Article