GRAMIN SEARCH BANNER

कोंड करूळ, गुहागर येथे मच्छीमार बंधू-भगिनींसाठी “समुद्री शेवाळ पालन” प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

Gramin Varta
28 Views

गुहागर : कोंड करूळ, गुहागर येथे रिलायन्स फाऊंडेशन, जलजीविका संस्था व सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय विभाग, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने मच्छीमार बांधव व भगिनींसाठी “समुद्री शेवाळ पालन” या विषयावर मार्गदर्शन व प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमात रिलायन्स फाउंडेशनमार्फत सागरी हवामानविषयक माहिती, संभाव्य मत्स्य साठा क्षेत्र आदी बाबींचे सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

जलजीविका संस्थामार्फत मच्छीमारांसाठी समुद्री शेवाळाचे महत्त्व, त्यातील व्यवसाय संधी, शेवाळ व्यवस्थापन याविषयी माहिती देण्यात आली. राज पवार व सृष्टी सुर्वे यांनी राफ्ट बांधणीचे प्रात्यक्षिक सादर केले. प्रकल्प व्यवस्थापक चिन्मय दामले यांनी समुद्री शेवाळ शेतीमुळे स्थानिक समुदायासाठी रोजगार व आर्थिक प्रगती कशी साधता येते, हे स्पष्ट केले.

सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय विभागाचे परवाना अधिकारी श्री. स्वप्नील चव्हाण यांनी मच्छीमारांना प्रकल्प राबवण्याचे आवाहन करताना, विभागाच्या विविध योजना, पावसाळी मासेमारी बंदी, तसेच अपघात गट विमा व NFDB पोर्टलवरील नोंदणी याचे महत्त्व सांगितले.

रिलायन्स फाउंडेशनचे जिल्हा व्यवस्थापक श्री. राजेश कांबळे यांनी समुद्री शेवाळ जोडधंदा म्हणून कसा उपयुक्त आहे, हे समजावून सांगितले. शेवाळ शेतीसाठी लागणारे तांत्रिक मार्गदर्शन जलजीविका संस्था व मत्स्यव्यवसाय विभाग पुरवतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाला जलजीविका संस्थेचे प्रकल्प समन्वयक राज पवार, सृष्टी सुर्वे, सागरी पर्यवेक्षक विनायक शिंदे, सागरमित्र, सुरक्षा रक्षक, रिलायन्स फाउंडेशनचे कार्यक्रम सहायक गौरव जाधव तसेच कोंड करूळ गावातील मच्छीमार बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Total Visitor Counter

3369364
Share This Article