GRAMIN SEARCH BANNER

गॅस सिलेंडरच्या भीतीने लांज्यात सकाळपासून ग्राहकांच्या रांगा; काळाबाजाराचीही चर्चा

Gramin Varta
173 Views

लांजा : शहरात गॅस सिलेंडर मिळण्याबाबत भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने गुरुवारी सकाळपासूनच ग्राहकांनी गॅस केंद्रांवर मोठ्या रांगा लावल्याचे चित्र पाहायला मिळाले. विशेषतः एचपी गॅस केंद्रावर सकाळीच मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची गर्दी झाल्याने काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.

जागतिक घडामोडींचा परिणाम आता सर्वसामान्यांच्या चुलीपर्यंत पोहोचू लागल्याची चर्चा शहरात सुरू आहे. इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावामुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळण्यात अडचणी येत असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. या चर्चेचा परिणाम घरगुती ग्राहकांवरही दिसून येत असून सिलेंडर मिळणार की नाही या भीतीपोटी अनेकांनी गॅस एजन्सीकडे धाव घेतली.

परिणामी, गेल्या तीन ते चार दिवसांपासून लांजा शहरातील गॅस केंद्रांवर सकाळपासूनच ग्राहकांच्या लांबचलांब रांगा लागल्याचे दिसून येत आहे. सिलेंडर मिळवण्यासाठी काही ठिकाणी ग्राहकांमध्ये झुंबड उडाल्याचेही चित्र दिसले. उन्हातान्हात तासनतास उभे राहून नागरिक सिलेंडरची वाट पाहत असल्याने ग्राहकांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत.

दरम्यान, गॅस सिलेंडरच्या संभाव्य टंचाईचा फायदा घेत काही ठिकाणी काळाबाजार सुरू असल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे. एरवी ९०० ते ९७५ रुपयांना मिळणारा घरगुती गॅस सिलेंडर १२०० ते १३०० रुपयांपर्यंत विकला जात असल्याच्या चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहेत. सरकारकडून घरगुती गॅस सिलेंडरचा कोणताही तुटवडा नसल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

एकीकडे नागरिकांना आठ ते दहा दिवस सिलेंडरची वाट पाहत तासनतास रांगेत उभे राहावे लागत असताना दुसरीकडे काळाबाजारासाठी सिलेंडर येतात कुठून, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणात प्रशासनाने तातडीने लक्ष घालून काळाबाजार होत आहे का याची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Total Visitor Counter

3366860
Share This Article