GRAMIN SEARCH BANNER

दुर्मिळ मास्क बुबी पक्षाचे कोकणात आगमन

दापोली : तालुक्यातील मुर्डी गावात एक दुर्मिळ समुद्री पाहुणा – मास्क बुबी पक्षी आढळून आला असून, स्थानिक शेतकरी आणि वनविभागाच्या सतर्कतेमुळे त्याचा यशस्वी बचाव करून पुन्हा समुद्रकिनाऱ्यावर सोडण्यात आला. भारताच्या किनारपट्टीवर क्वचितच दिसणाऱ्या या पक्ष्याच्या आगमनाने निसर्गप्रेमींमध्ये आनंदाची लहर उसळली आहे.

शनिवारी दुपारी मुर्डी येथील शेतकरी वैभव झगडे यांच्या शेतात एक मोठा, बदकासारखा पण अज्ञात पक्षी अत्यंत थकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याच्या हालचाली अत्यंत मर्यादित होत्या आणि पंख पूर्णपणे ओले झाले होते. झगडे यांनी तत्काळ दापोली वनविभागाशी संपर्क साधला. माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी आणि निसर्गप्रेमी मनित बाईत व प्रतीक बाईत घटनास्थळी दाखल झाले.

प्राथमिक तपासणीनंतर सुरक्षित मुक्तता

पक्ष्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला तात्पुरत्या संरक्षणात ठेवण्यात आले. संध्याकाळी दापोली वन विभाग आणि वाईल्ड अॅनिमल रेस्क्यू संघाच्या संयुक्त प्रयत्नांतून आंजर्ले समुद्रकिनाऱ्यावर त्याला सुरक्षितपणे मुक्त करण्यात आले.

मास्क बुबी पक्ष्याची वैशिष्ट्ये

उगमस्थान: मुख्यत्वेकरून मास्क बुबी पक्षी उष्ण कटिबंधीय आणि उपोष्ण कटिबंधीय महासागरांमध्ये आढळतो. तो प्रामुख्याने हवाई बेटे, कॅरिबियन, पॅसिफिक आणि हिंद महासागरातील द्वीपसमूहांमध्ये विणीकरिता वास्तव्य करतो.

दिसायला: याचा रंग पांढऱ्या शरीरावर काळी पंखांची किनार असलेला असतो, आणि चेहऱ्यावर एक प्रकारचा काळसर “मुखवटा” असतो, ज्यामुळे त्याला “Masked” हे नाव मिळाले.

आकार: सुमारे ७०-८५ सेमी उंचीचा आणि पंखांची लांबी १५० सेमी पर्यंत असते.

भोजन: मास्क बुबी पक्षी समुद्रात मासे आणि स्क्विड पकडण्यासाठी उंचावरून थेट पाण्यात झेप घेतो.

निवास: हा पक्षी ओपन समुद्रात राहतो आणि फक्त विणीकरिता किनाऱ्यावरील बेटांवर येतो.

कोकणात आगमन कसे?

मास्क बुबी पक्षी भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर फारच क्वचित येतो. याचे मुख्य कारण म्हणजे वादळी वारे, चक्रीवादळे किंवा अन्नाच्या शोधात भरकटणे. अशावेळी हे पक्षी आपल्या नेहमीच्या अधिवासापासून दूर वाहून येतात. यापूर्वीही महाराष्ट्राच्या काही किनारपट्टी भागांमध्ये हे पक्षी मरणावस्थेत किंवा थकलेल्या अवस्थेत सापडल्याची नोंद आहे.

स्थानिकांचे कौतुक

या दुर्मीळ पक्ष्याच्या बचाव कार्यासाठी शेतकरी, निसर्गप्रेमी आणि वनविभाग यांनी दाखवलेली तत्परता आणि संवेदनशीलता कौतुकास्पद आहे. अशा घटनांमुळे स्थानिक पातळीवर निसर्गसंवर्धनाचे महत्व अधोरेखित होते, असे मत निसर्ग अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.

Total Visitor

0217877
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *