खेड: मुंबई-गोवा महामार्गावरील लोटे गावाजवळ तलारी फाट्याजवळ, महालक्ष्मी मार्बल अँड स्टील दुकानासमोर शुक्रवारी रात्री ७.१५ वाजण्याच्या सुमारास झालेल्या मोटारसायकलच्या अपघातात दोन जण जखमी झाले आहेत. भरधाव वेगात आलेल्या मोटारसायकलने दुसऱ्या एका मोटारसायकलला धडक दिल्याने हा अपघात झाला. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बसराज होन्नाप्पा पुजारी (वय २७) हे त्यांची मोटारसायकल (क्र. एम.एच. ५० के ३२८७) चालवत होते. त्यांच्या पाठीमागे त्यांचे मित्र मयुर दुंडाप्पा नाईक बसले होते. ते लोटे तलारीवाडीहून पिरलोटेच्या दिशेने जात असताना, त्यांच्या मागून भरधाव वेगात आलेल्या मोटारसायकल (क्र. एम.एच.०८ जे ६७९६) वरील चालक राकेश चंदकांत भालेराव पठाडे (वय ३३, रा. पिरलोटे, ता. खेड) याने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली.
या धडकेमुळे राकेश भालेकर हा डिव्हायडरवर आपटून त्याच्या नाका-तोंडातून रक्तस्त्राव सुरू झाला, तर पाठीमागे बसलेल्या मयुर नाईक यांच्या उजव्या पायाच्या घोट्याला मार लागून ते जखमी झाले. या घटनेनंतर फिर्यादी बसराज पुजारी यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ आणि भारतीय दंड विधान कलम २८१, १२५(अ) अंतर्गत गु.आर.नं. २५२/२०२५ नुसार आरोपी राकेश भालेराव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याची पुढील चौकशी खेड पोलीस करत आहेत.