राजापूर: आगामी आषाढी एकादशी आणि मोहरम या सणांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांनी राजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. त्यांनी विठ्ठल मंदिर आणि जमा मस्जिद येथे स्वतः उपस्थित राहून पाहणी केली आणि संबंधित विश्वस्त व धर्मगुरूंशी चर्चा करून सामाजिक सलोखा आणि शांतता राखण्याबाबत मार्गदर्शन केले.
या दोन्ही महत्त्वाच्या सणांदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासकीय पातळीवर खबरदारी घेतली जात आहे. पोलीस अधीक्षक बगाटे यांनी यावेळी उपस्थित सर्व संबंधितांना शांतता समितीच्या सूचनांचे पालन करण्याचं आवाहन केलं. तसेच, धार्मिक सलोखा कायम ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं, असं आवाहनही त्यांनी केलं.
या भेटीदरम्यान पोलीस अधीक्षक बगाटे यांच्यासमवेत उप विभागीय पोलीस अधिकारी, रत्नागिरी तथा लांजा उपविभागाचा अतिरिक्त पदभार सांभाळणारे श्री. निलेश माईनकर, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्री. शिवप्रसाद पारवे, राजापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. अमित यादव, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे आणि जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विवेक पाटील उपस्थित होते.
तसेच राजापूरचे माजी नगराध्यक्ष जमीर खलिफे, प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.