चिपळूण: राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरीवर्ग गंभीर संकटात सापडला आहे. शासनाने ओला दुष्काळ घोषित करून शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी. दरहेक्टर ५० हजार रुपये मदत जाहीर करावी, अशी मागणी चिपळूण तालुका काँग्रेस कमिटीतर्फे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देत करण्यात आली.
काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांची भेट घेत मागण्याचे निवेदन दिले व चर्चा केली. या वेळी पदाधिकारी म्हणाले, राज्यातील शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्यसरकारने अद्याप कोणताही दिलासा दिलेला नाही. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काही राज्यांत पूरस्थिती निर्माण झाल्यानंतर पंतप्रधानांनी तातडीने दौरे केले; मात्र महाराष्ट्रात आजपर्यंत दौरा केला नसल्याने शेतकरीवर्ग नाराज आहे. शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळावी, त्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी आणि ओला दुष्काळ घोषित करून दिलासा द्यावा. अनेक शेतकऱ्यांची शेतीची साधने वाहून गेली आहेत. जमिनीची धूपदेखील मोठ्या प्रमाणात झालेली आहे. घरांसह शेतीपिकांचे नुकसान झाल्याने त्यांना उभारी देण्यासाठी शासनानेच पुढाकार घ्यायला हवा अन्यथा या पूरग्रस्त शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येईल. सत्ताधारी मंत्री केवळ पाहणी करण्यात गुंतले आहेत. अद्याप राज्यसरकारने पूरग्रस्तांना मदतीचा हात दिलेला नाही. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पुन्हा उभारी देण्यासाठी कर्जमाफी योजना राबवावी, अशी मागणीही करण्यात आली.
या वेळी सोनललक्ष्मी घाग, लियाकत शाह, संतोष सावंतदेसाई, संजय जाधव, सुबोध सावंतदेसाई, कबीर काद्री, यशवंत फके, कांता चिपळूणकर, डॉ. सरफराज गोठे, अजित शिंदे, लियाकत शेख, राजेंद्र भुरण, इंतिखाब चौगुले, दादा आखाडे, महादेव चव्हाण, निर्मला जाधव, वीणा जावकर, सफा गोठे, नंदा भालेकर, साजिद सरगुरोह, डॉ. दीपक विखारे, अनिल रेपाळ, सुनील खेडेकर, विनायक जाधव, सुरेश राऊत, कैसर देसाई आदी उपस्थित होते.