GRAMIN SEARCH BANNER

आता बस झाले तुमचे लाड, महामार्ग चौपदरीकरणास मुदतवाढ नाहीच

वाढीव निधीची मागणी करणाऱ्या ठेकेदारांवर गडकरी संतापले

कोकणातील आणखी 3 मार्गांचे चौपदरीकरण करणार : गडकरी

रत्नागिरी : मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम चौदा वर्षे रखडले तरी आरवली ते कांटे आणि कांटे ते वाकेड या दोन टप्प्याच्या ठेकेदारांना अजून मुदतवाढ हवी आहे; परंतु केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी मुदतवाढ देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. मार्च २०२६ या मुदतीत काम पूर्ण करण्याची सक्ती केली आहे. काम लांबल्याने मूळ अंदाजपत्रकापेक्षा खर्चात सुमारे ३० टक्के वाढ होणार आहे.

दोन दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदारांची दिल्लीत बैठक झाली. यावेळी मुंबई-गोवा हा महामार्ग पूर्ण करण्याकडे आपले अधिक लक्ष असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

चौदा वर्षे काम अपूर्ण असल्याने शासनाला विरोधक आणि जनतेच्या
रोषाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे केंद्रीय सार्वजनिक वाहतूकमंत्री आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री या राष्ट्रीय महामार्गाचा वारंवार पाहणी दौरा करत आहेत. आरवली ते कांटे हा ३९ किमीचा टप्पा आहे. सुमारे ६९२ कोटींचे काम आहे; परंतु अजून ते अपूर्णच आहे तर दुसरा टप्पा कांटे ते वाकेड हा ४९ किमीचा असून, त्याचे अंदाजपत्रक ८०० कोटीचे आहे. दोन्ही टप्प्यांचे काम अजून अपूर्ण आहे.

या दोन्ही टप्प्यांना पुन्हा मुदतवाढ मिळावी अशी मागणी ठेकेदरांनी दिल्लीतील बैठकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती; परंतु गडकरी यांनी ती फेटाळून आहे त्या मुदतीत काम पूर्ण करण्याचे कंपन्यांना आदेश दिले आहेत. त्यामुळे अपूर्ण राहिलेले हे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. आरवली ते कांटेमध्ये या टप्प्याला ३०० तर कांटे ते वाकेड टप्प्याला २५० कोटी वाढीव रकमेची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले.

कोकणातील आणखी 3 मार्गांचे चौपदरीकरण

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कोकणातील आणखी तीन दुपदरी मार्गाच्या चौपदरीकरणाचा प्रस्ताव देण्यास सांगितला आहे. यामध्ये सावंतवाडी ते आंबोली, तरळा ते गगनबावडा आणि गुहागर ते चिपळूण या मार्गांचा समावेश आहे. सुमारे ४० किमीचे हे मार्ग आहेत. एक किमीला सुमारे २० कोटीप्रमाणे सुमारे १२०० कोटी रुपये या तीन मार्गांना लागणार आहेत. त्याबाबतचा प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकामविभागाला दिल्या आहेत.

Total Visitor Counter

2455614
Share This Article