आमदार शेखर निकम लक्ष घालतील का?
संगमेश्वर / प्रतिनिधी
तालुक्यातील कडवई येथील वाणीवाडी बाजारपेठेतील स्मशानभूमीकडे जाण्यासाठी आजही कोणताही रस्ता उपलब्ध नाही. गेल्या तब्बल सत्तर वर्षांपासून ग्रामस्थांना अंत्यविधीसाठी मृतदेह वाहून नेताना अक्षरशः मृत्यूशी झुंज द्यावी लागत आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाने लक्ष न दिल्याने ग्रामस्थ आता आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे समजते.
कडवई वाणीवाडी, बाजारपेठ व समर्थनगर या भागातील लोकांना अंत्यविधीसाठी कडवई तुरळ मार्गालगत नदीपलीकडील स्मशानभूमीचा वापर करावा लागतो. मात्र या स्मशानभूमीकडे जाण्यासाठी पक्का मार्ग किंवा पूल नसल्याने मोठा अडथळा निर्माण झाला आहे. पावसाळ्यात तर मुसळधार पावसात शव वाहून नेण्यासाठी ग्रामस्थांना पाण्याचा प्रवाह पार करावा लागतो. अनेकवेळा तरुणांनी मानवी साखळी करून मृतदेह वाहून नेले असून, जीव धोक्यात घालूनही प्रसंगावधानाने अनर्थ टळला आहे.
यापूर्वी या स्मशानभूमीच्या जागेचा वाद न्यायालयात प्रलंबित होता. परंतु तो आता सामोपचाराने मिटवण्यात आला आहे. तरीदेखील रस्त्याच्या अभावामुळे ग्रामस्थांना सतत जीवघेणा त्रास सहन करावा लागत आहे. गेली अनेक वर्षे ग्रामस्थांनी प्रशासनाकडे पत्रव्यवहार करून रस्ता व पूल करण्याची मागणी केली. मात्र न्यायालयीन वादाचे कारण पुढे करून प्रस्तावांकडे दुर्लक्षच करण्यात आले.
आता वाद मिटल्याने प्रशासनाने तत्काळ लक्ष देऊन स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता व पूल उभारावा, अन्यथा नाईलाजाने रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल, असा इशारा ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे.
कडवई वाणीवाडी बाजारपेठ येथे स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ताच नाही : नदीतून प्रेत नेण्याची वेळ
