GRAMIN SEARCH BANNER

आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त आयोजित ‘रेड रिबन’ स्पर्धेत रत्नागिरीची नित्या फणसे राज्यात प्रथम

रत्नागिरी: आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेतर्फे (MSACS) आयोजित राज्यस्तरीय ‘रेड रिबन प्रश्नमंजुषा’ स्पर्धेत रत्नागिरीच्या पटवर्धन हायस्कूलची विद्यार्थिनी कुमारी नित्या संदीप फणसे हिने राज्यात पहिला क्रमांक पटकावून जिल्ह्याची मान उंचावली आहे. या दैदिप्यमान यशामुळे तिची आता १० सप्टेंबर रोजी होणाऱ्या प्रादेशिक स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा नुकताच मुंबई येथे पार पडला. यावेळी प्रकल्प संचालक डॉ. सुनील भोकरे, आरोग्य सेवा पुणे व अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ. विजय कंदेवाड आणि संचालक डॉ. राहुल जाधव यांच्या हस्ते नित्या फणसेला २५,००० रुपयांचे रोख पारितोषिक, ट्रॉफी आणि सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले.
या स्पर्धेच्या यशस्वी प्रवासाची सुरुवात जिल्हास्तरावर झाली होती. रत्नागिरी जिल्ह्यातून ४४ स्पर्धकांनी भाग घेतला होता, ज्यात नित्याने प्रथम क्रमांक मिळवून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली. नवी मुंबई येथील आगरी कोळी संस्कृती भवन येथे १० ऑगस्ट रोजी झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेतही नित्याने आपले कौशल्य सिद्ध करत राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला. या स्पर्धेतील पहिले दोन विजेते प्रादेशिक स्तरावरील स्पर्धेसाठी पात्र ठरतात, त्यामुळे नित्याची या पुढील टप्प्यासाठी निवड झाली आहे.

नित्याच्या या यशामागे रत्नागिरी जिल्हा एड्स नियंत्रण विभागाचे मोठे सहकार्य लाभले. तिला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, सचिन पाटील, सतीश कांबळे, आणि दिपाली किंजळे यांचे मार्गदर्शन मिळाले. तसेच, पटवर्धन हायस्कूलमधील शिक्षकवृंद आणि तिच्या आई-वडिलांच्या पाठिंब्यामुळे तिला हे यश संपादन करता आले. नित्याच्या या कामगिरीबद्दल रत्नागिरी जिल्ह्यातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Total Visitor Counter

2455607
Share This Article