GRAMIN SEARCH BANNER

फुणगुस बाजारपेठेत शौचालयाचा गंभीर प्रश्न ; ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष!

Gramin Varta
262 Views

साहिम खान यांचा प्रशासनाला जाब : ग्रामसभा झाली, पण काम अजून सुरूच नाही!

फुणगूस: फुणगूस ग्रामपंचायतीच्या अखत्यारीतील बाजारपेठेच्या मुख्य रस्त्यावर सार्वजनिक शौचालयाची सुविधा नसल्यामुळे स्थानिक नागरिकांसह महिलांना व प्रवाशांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. विशेषतः महिलांसाठी ही समस्या अत्यंत गंभीर बनली आहे. या गंभीर प्रश्नावर स्थानिक तरुण आणि जागरूक कार्यकर्ते साहिम खान यांनी ग्रामसभेत जोरदार आवाज उठवला होता, मात्र ग्रामसभा होऊन अनेक दिवस उलटूनही ग्रामपंचायतीकडून यावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, ही बाब अत्यंत खेदजनक आहे.

साहिम खान यांनी प्रशासनाच्या या भूमिकेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी थेट सवाल केला की, ग्रामसभेत शौचालयाच्या बांधकामाचा ठराव होऊनही अजूनपर्यंत एक वीटही हलवली गेलेली नाही. प्रवासी वर्ग आणि महिलांना उघड्यावर शौचास जावे लागते, ही बाब फुणगूस ग्रामपंचायतीसाठी लाजिरवाणी आहे.

दरम्यान, फुणगूस गावातून सांगमेश्वर-गणपतीपुळे हा महत्त्वाचा राज्यमार्ग जातो. त्याचप्रमाणे, बाजूलाच असलेल्या सीएनजी पंपामुळे या रस्त्यावर वाहनांची आणि प्रवाशांची दिवसभर सतत वर्दळ असते. बाजारपेठेत अनेक नागरिक खरेदीसाठी आणि प्रवासी थांबत असताना, शौचालयाची मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्यामुळे महिलांसह सर्वसामान्य लोकांना उघड्यावर जाण्याची पाळी येते आहे. गावाच्या कथित हागणदारीमुक्त दाव्यालाच हा प्रकार चपराक मारणारा आहे, असे स्पष्ट चित्र आहे.

स्थानिक ग्रामस्थांनी ग्रामपंचायत आणि शासनाच्या या अक्षम्य दुर्लक्षाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. साहिम खान यांनी वारंवार प्रश्न उपस्थित करूनही प्रशासन व ग्रामपंचायतीकडून याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले जात असल्याची खंत ग्रामस्थांनी बोलून दाखवली आहे.
फुणगूस बाजारपेठेत तातडीने सार्वजनिक शौचालय बांधकाम सुरू करून नागरिकांच्या आरोग्य आणि स्वच्छतेच्या मूलभूत हक्काचा सन्मान करण्यात यावा, अशी ठाम मागणी स्थानिक नागरिक आणि साहिम खान यांनी प्रशासनाकडे केली आहे. ग्रामपंचायतीने यावर त्वरित कारवाई न केल्यास आंदोलनाचा पवित्रा घेतला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Total Visitor Counter

3209945
Share This Article