GRAMIN SEARCH BANNER

ग्रामसेवक शहरात, गाव विकास ठप्प; पिरंदवणे ग्रामस्थांचा संतप्त सवाल : “मुख्यालयी राहण्याची एलर्जी का?”

Gramin Varta
266 Views

एजाज पटेल / संगमेश्वर

तालुक्यातील पिरंदवणे ग्रामपंचायतीतील विकासकामे गेल्या काही काळापासून ठप्प असल्याची तक्रार ग्रामस्थांकडून जोर धरत आहे. शासनाने स्पष्ट आदेश देऊनही येथे कार्यरत असलेल्या ग्रामसेविका मुख्यालयी न राहता तालुक्याच्या शहरी भागातून ये-जा करत असल्यामुळे गावाच्या दैनंदिन कामकाजावर मोठा परिणाम होतो आहे. परिणामी विविध शासकीय कामांसाठी ग्रामपंचायत कार्यालयात चकरा मारणाऱ्या ग्रामस्थांचा रोष दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

शासनाने नियुक्त केलेल्या ग्रामसेवकांनी मुख्यालयी राहून गावकऱ्यांची कामे वेळेत आणि पारदर्शक रितीने करावीत, असे स्पष्ट बंधनकारक नियम आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या कल्याणकारी योजना प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचाव्यात या उद्देशाने जिल्हा परिषदांमार्फत ग्रामसेवकांना मुख्यालयी उपस्थित राहणे आवश्यक आहे. मात्र पिरंदवणे ग्रामपंचायतची स्थिती याला अपवाद ठरत आहे. येथील ग्रामसेविका मुख्यालयापासून वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या शहरात वास्तव्य करत असल्याने त्यांच्या कार्यालयीन उपस्थितीवर नेहमीच प्रश्नचिन्ह उभे राहते.

ग्रामपंचायत ही गावाची मिनी सचिवालय मानली जाते — विकास आराखडे, विविध योजना, शासकीय कागदपत्रे, विद्यार्थ्यांसाठी लागणारी प्रमाणपत्रे इथपासून ते ग्रामस्थांच्या दैनंदिन गरजांपर्यंत सर्व प्रक्रिया ग्रामसेवकांवर अवलंबून असतात. परंतु, अधिकारी वेळेत हजर नसल्यामुळे अनेकांना आवश्यक कागदपत्रांसाठी दिवसभर हेलपाटे मारावे लागत असल्याची तक्रार स्थानिकांकडून होत आहे. काही जण तर आवश्यक कामे दिवसन्‌दिवस प्रलंबित राहत असल्याचे सांगतात.

गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ या ग्रामसेविकेकडेच ग्रामपंचायतीचा कारभार असून, त्यांच्या मनमानी पद्धतीविरोधात ग्रामस्थांनी यापूर्वीही असंतोष व्यक्त केला होता. त्यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशीचे आश्वासन देत सेवा सुधारण्याचे आदेश दिले होते. मात्र हे आश्वासन हवेत विरले, कारण आजही तीच परिस्थिती कायम आहे, असा आरोप ग्रामस्थ करतात.

कारभारातील या सातत्यपूर्ण ढिसाळपणाला कंटाळून ग्रामस्थांनी यावेळी थेट जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन चौकशी आणि कठोर कारवाईची मागणी करण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाच्या आदेशाला धाब्यावर बसवणाऱ्या या वृत्तीमुळे गाव विकासाच्या गाड्याच थांबल्या असल्याचा आरोप ग्रामस्थांनी पुन्हा एकदा उचलून धरला आहे.

Total Visitor Counter

3072146
Share This Article