रत्नागिरी: शहरातील साळवी स्टॉप ते परटवणे मार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या एका टेम्पोने स्कुटरला दिलेल्या जोरदार धडकेत दोन जण जखमी झाले आहेत. हा अपघात १ मार्च २०२६ रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास स्टेट बँक कॉलनीकडे जाणाऱ्या अंतर्गत रस्ता परिसरात घडला असून, याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात ७४ वर्षीय चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मधुकर कृष्णा जाधव (रा. गावखडी, जि. रत्नागिरी) हे आपल्या ताब्यातील टाटा सुपर एसीई टेम्पो (क्र. एम एच ०८/डब्ल्यू /१८२१) घेऊन साळवी स्टॉपकडून परटवणेच्या दिशेने जात होते.
यावेळी स्टेट बँक कॉलनीकडे जाण्यासाठी त्यांनी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून अचानक ‘शॉर्टकट’ टर्न घेतला. टेम्पो अतिशय वेगात आणि निष्काळजीपणे वळवल्यामुळे समोरून येणाऱ्या ॲक्टिव्हा स्कुटरला (क्र. एम एच ०८ ए.व्ही. १८८२) त्याने जोरदार धडक दिली.या भीषण अपघातात स्कुटरवरील अविनाश अरुण गांगरकर (वय २५, रा. आसुदे, लांजा) आणि मयंक संदेश गांगरकर (वय ८, रा. आदिनाथनगर, टीआरपी) हे दोघेही जखमी झाले आहेत. या धडकेत स्कुटरचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार अमिता संदीप पाटील यांनी फिर्याद दिली असून, पोलिसांनी आरोपी मधुकर जाधव यांच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१, १२५ (अ), १२५ (ब) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.







