GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी : रथसप्तमी निमित्त १ लाख सूर्यनमस्कार यज्ञ यशस्वी

Gramin Varta
54 Views

रत्नागिरी: रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीने रथसप्तमीनिमित्त आयोजित केलेला १ लाख सूर्यनमस्काराचा यज्ञ उपक्रम अत्यंत उत्साहात, शिस्तबद्ध आणि भक्तिमय वातावरणात यशस्वीपणे पार पडला.

या उपक्रमास संस्थेच्या कार्याध्यक्ष शिल्पा पटवर्धन यांची प्रमुख उपस्थिती लाभली. प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष सौ. शिल्पा सुर्वे, सहसचिव श्रीकांत दुदगीकर, महेश नाईक, जिमखाना अध्यक्ष चंद्रशेखर केळकर, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर मान्यवर उपस्थित होते.

शुक्रवारी, दि. २३ जानेवारी रोजी सूर्यनमस्कार यज्ञास सकाळी ६.०० वाजता प्रारंभ झाला. या उपक्रमात संस्था पदाधिकारी, शिक्षक-कर्मचारी तसेच विविध शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय, रा. भा. शिर्के प्रशाला, गोदुताई जांभेकर विद्यालय, श्रीमान गंगाधर गोविंद पटवर्धन इंग्लिश मीडियम स्कूल, बाबासाहेब नानल गुरुकुल व कै. बाबुराव जोशी गुरुकुल या संस्थांचा सहभाग लाभला. दी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या फाटक हायस्कूलमधील ८४ विद्यार्थ्यांनी विशेष सहभाग नोंदविला.

या उपक्रमात रत्नागिरीतील योग अभ्यासक श्रीकांत ढालकर यांनी सूर्यनमस्कार व योगाभ्यासाबाबत मार्गदर्शन केले. सकाळी ६.०० ते ९.०० या कालावधीत एकूण २५०० विद्यार्थ्यांच्या सहभागातून १,१५,४३० सूर्यनमस्कार पूर्ण करण्यात आले. अॅड. बाबासाहेब नानल गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी योगासने व सूर्यनमस्कारांची प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची दाद मिळविली.

आतापर्यंत आपल्या आयुष्यात १३ लाख सूर्यनमस्कार पूर्ण केलेल्या विश्वनाथ बापट यांचा रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीतर्फे सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेच्या सर्व शाळांतील क्रीडाशिक्षकांनी नियोजनबद्ध व अथक परिश्रम घेतले, असे आयोजकांनी सांगितले.

सूर्यनमस्कार हा केवळ व्यायाम नसून आरोग्य, शिस्त व भारतीय संस्कृतीचे प्रतीक असून नियमित सूर्यनमस्कारामुळे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य वृद्धिंगत होते. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीने हा उपक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांच्या तंदुरुस्तीकडे लक्ष दिले आहे. मोबाइलच्या युगात विद्यार्थ्यांना नियमित व्यायामाची सवय आवश्यक आहे, असे यावेळी नगराध्यक्ष सौ. शिल्पा सुर्वे यांनी सांगितले.

Total Visitor Counter

3072968
Share This Article