मंडणगड : तालुक्यातील बाणकोट सागरी पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षकासह एकूण दहा जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, 23 जुलै रोजी शाळा सुटल्यानंतर संशयित शिक्षकाने मोबाईल चार्जरच्या कारणावरून दोन विद्यार्थिनींना घरी बोलावले. त्यापैकी एका मुलीला दुकानावर पाठवून दुसऱ्या मुलीला हॉलमध्ये नेऊन तिचा हात धरून लज्जास्पद कृत्य केले. घाबरलेल्या मुलीने घरी परतल्यानंतर घडलेला प्रकार नातेवाईकांना सांगितला.
पालकांनी तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला असता, गावातील काही व्यक्तींनी दबाव टाकून तसे न करण्यास भाग पाडले. अखेर दीड महिन्यानंतर 19 सप्टेंबर रोजी पालकांनी बाणकोट सागरी पोलिस ठाण्यात औपचारिक तक्रार दिली.
या प्रकरणी मुख्य संशयित निलेश अशोक कांबळे याच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS 2023) कलम 74 तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (POCSO) अधिनियम 2012 चे कलम 8, 12 आणि 21 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रार रोखण्यासाठी दबाव आणल्याप्रकरणी प्रकाश रामजी शिगवण, सुभाष रामजी शिगवण, वैभव पांडुरंग भानसे, पांडुरंग यशवंत शिगवण, रघुनाथ गुणाजी भानसे, शंकर रामजी होडबे, मनोहर जानू जोशी, संदीप यशवंत कांबळे आणि राकेश साळुंखे या नऊ जणांविरोधातही गुन्हे दाखल झाले आहेत.
बाणकोट पोलिस निरीक्षक संजय चव्हाण यांनी गुन्हा नोंद झाल्याची माहिती दिली.
मंडणगडमध्ये शाळकरी मुलीचा विनयभंग; शिक्षकासह नऊ जणांविरोधात गुन्हा
