लांजात मंदिराच्या वादातून ६३ वर्षीय वृद्धाला मारहाण; पाच जणांविरोधात गुन्हा

saurabhsalvi26@gmail.com
2 Min Read

लांजा : किरकोळ कारणावरून ६३ वर्षीय वृद्धाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना लांजा तालुक्यातील भांबेड कुडेवाडी येथे बुधवारी (११ मार्च) रात्री सुमारे १०.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी लांजा पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.याबाबत लांजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाष शामकांत मोरे (वय ६३, रा. भांबेड कुडेवाडी) यांनी याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. भांबेड कुडेवाडी येथे जांगल देवाचे जुने मंदिर असून ते पाडून त्याठिकाणी नवीन मंदिर उभारण्याचा गावकऱ्यांनी निर्णय घेतला होता.

त्यानुसार सुभाष मोरे यांनी मंदिराच्या जागी नारळ ठेवला होता.याच कारणावरून गावातील काही व्यक्तींमध्ये वाद निर्माण झाला. या वादातून श्रीधर शंकर मोरे (वय ८०), तुळशीराम शंकर मोरे (वय ७२), तेजस तुळशीराम मोरे (वय ३५), श्रद्धेश तुळशीराम मोरे उर्फ बारक्या (वय ३२) आणि गणेश जयराम मोरे (वय ५५, सर्व रा. भांबेड कुडेवाडी, ता. लांजा) यांनी बुधवारी रात्री सुभाष मोरे यांच्या घरी जाऊन बेकायदा जमाव करून गोंधळ घातल्याचे तक्रारीत नमूद आहे. तसेच त्यांनी शिवीगाळ करत हाताच्या थपडा व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत सुभाष मोरे यांच्या उजव्या हाताच्या करंगळीला दुखापत झाली असून त्यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.घटनेनंतर सुभाष मोरे यांनी लांजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी वरील पाच जणांविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १८९(२), १९१(२), १९०, ११५(२), ३५२ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनेश आखाडे करीत आहेत.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *