रत्नागिरी: जिल्ह्याच्या विविध भागांत आज अचानक सुटलेल्या वेगवान वादळी वाऱ्याने आंबा बागायतदार आणि व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. सायंकाळच्या सुमारास निसर्गाचा कोप झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली असून सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आंबा पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. यंदाचा हंगाम आधीच विविध नैसर्गिक संकटांमुळे लांबणीवर पडलेला असताना, आता ऐन काढणीच्या हंगामात झालेल्या या वादळामुळे आंबा पट्ट्यात चिंतेचे सावट पसरले आहे. ‘आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास’ अशी अवस्था झालेल्या आंबा व्यापाऱ्यांसमोर आता मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे.
आज दुपारी अचानक हवामानात बदल झाला आणि सोसाट्याचा वारा सुटला. या वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की अनेक ठिकाणी तयार झालेला आंबा झाडावरून गळून पडला. अनेक बागांमध्ये आब्यांचा सडा पडलेला पाहायला मिळत असून, जमिनीवर पडलेला हा आंबा आता विक्रीसाठी बाद ठरण्याची शक्यता असल्याने बागायतदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. केवळ फळगळच नव्हे, तर वाऱ्याच्या तीव्रतेमुळे अनेक ठिकाणी पूर्ण वाढलेली झाडे मुळासकट उन्मळून पडली आहेत, तर काही ठिकाणी झाडांच्या मोठ्या फांद्या तुटल्याने झाडांचेही कायमस्वरूपी नुकसान झाले आहे.
यंदाच्या हंगामात सुरुवातीपासूनच लहरी हवामानाचा फटका बसत असताना, व्यापारी मोठ्या आशेने या दिवसांची वाट पाहत होते. मात्र, आजच्या या आपत्तीने बागायतदारांसह फळ खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांचेही गणित पूर्णपणे कोलमडले आहे. अनेक व्यापाऱ्यांनी आगाऊ रकमा देऊन बागा घेतल्या आहेत, मात्र अशा प्रकारे झाडे आणि फळे पडल्याने त्यांनी लावलेली गुंतवणूकही वसूल होणे आता कठीण झाले आहे. ग्रामीण भागात या नुकसानीची तीव्रता अधिक असून, शासनाने तातडीने या परिस्थितीची दखल घेऊन कृषी विभागामार्फत बागांचे पंचनामे करावेत आणि पीडित बागायतदारांना तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. या संकटामुळे कोकणचा राजा समजल्या जाणाऱ्या हापूसच्या उत्पादनावर यंदा मोठे सावट आले असून, बाजारात आंब्याची आवक आणि दरावरही याचे परिणाम जाणवण्याची शक्यता आहे.





