GRAMIN SEARCH BANNER

दिशा सालियनची हत्या की आत्महत्या? ठोस कारण निश्चित करा, उच्च न्यायालयाने राज्य सरकारला बजावले

Gramin Varta
103 Views

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची माजी व्यवस्थापन दिशा सालियन हिच्या मृत्युची मुंबई पोलीस आणखी किती काळ चौकशी करणार ? असा प्रश्न उच्च न्यायालयाने गुरूवारी केला. दिशा हिच्या मृत्युला पाच वर्षे उलटली आहेत.

त्यामुळे पोलिसांना फक्त हे प्रकरण आत्महत्या की हत्येचे आहे हे निश्चत करायचे आहे, अशी टिप्पणीही न्यायालयाने केली.

दिशा हिच्या मृत्यूची चौकशी अजूनही सुरू आहे, असे सरकारी वकिलांनी सांगितल्यानंतर, न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती रणजित भोसले यांच्या खंडपीठाने उपरोक्त टिप्पणी केली. अजून चौकशी का ? एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे आणि घटनेला पाच वर्षे उलटली आहेत. त्यामुळे, पोलिसांना फक्त ही आत्महत्या आहे की हत्या हे तपासचे आहे, असेही न्यायालयाने म्हटले. तेव्हा, मृत्युच्या कारणांच्या सर्व शक्यतांची बारकाईने चौकशी केली जात असल्याचे सरकारी वकील मनकुँवर देशमुख यांनी न्यायालयाला सांगण्याचा प्रयत्न केला.

तसेच, घटनेनंतर पोलिसांनी दिशाच्या वडिलांचा आणि तिच्या आईचा अनेकवेळा जबाब नोंदवला. तथापि, प्रत्येकवेळी दोघांनीही त्यांना कोणावरही संशय नसल्याचे सांगितले होते. आता पाच वर्षांनंतर, दिशाचे वडील सतीश सालियन हे तिच्या मृत्युबाबत न्यायालयात धाव घेऊन शंका उपस्थित करत आहेत, असेही देशमुख यांनी न्यायालयाला सांगितले.

त्यावर, पोलिस याचिकाकर्त्यां त्यांच्या जबाबांच्या प्रती आणि कायद्यानुसार परवानगी असलेली तपासाशी संबंधित कागदपत्रे का देत नाहीत ? असा प्रश्न न्यायालयाने सरकारी वकिलांना केला. याचिकाकर्ते हे मृत्यू झालेल्या मुलीचे वडील आहेत आणि त्यामुळेच परवानगी असलेली कोणतीही कागदपत्रे त्यांना दिली जाऊ शकतात. त्यामुळे याचिकाकर्च्याला संबंधित कागदपत्रे उपलब्ध करणार की नाही याबाबत सरकारने ११ डिसेंबर रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीच्या वेळी भूमिका स्पष्ट करावी, असे आदेश न्यायालयाने दिले. त्याचवेळी, दिशा हिचा शवविच्छेदन अहवालही सादर करावा अशी सूचना दिली.

प्रकरण काय ?

दिशा हिचा ८ जून २०२० रोजी मालाड येथील एका निवासी इमारतीच्या १४व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली होती. त्यानंतर, काही दिवसांनी म्हणजेच १४ जून २०२० रोजी अभिनेता सुशांत सिंग राजपूत हा वांद्रे येथील त्याच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळून आला होता. सुशांतने आत्महत्या केल्याचे प्रकरण पोलिसांनी सुरुवातीला नोंदवले होते. तथापि, सुशांतने आत्महत्या केली नसून त्याची हत्या करण्यात आल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केल्यावर प्रकरण सीबीआयकडे वर्ग केले गेले होते.

त्यानंतर, दिशाचाही खून करण्यात आला होता आणि शिवसेनेचे (ठाकरे गट) आमदार आदित्य ठाकरे यांचा या प्रकरणाशी संबंध असल्याचा आरोप करण्यात आला. दिशाच्या कुटुंबीयांनी प्रत्येक वेळी तिचा खून झाल्याचा आरोप फेटाळला होता. त्यांनी न्यायालयात तसे प्रतिज्ञापत्रही दाखल केले होते. परंतु, दिशाचे वडील सतीश सालियन यांनी काही महिन्यांपूर्वी उच्च न्यायालयात नव्याने धाव घेऊन दिशाचा खून झाल्याचा दावा केला. तसेच, प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली. याशिवाय, या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्याची व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे, अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि इतरांना आरोपी करून त्यांना अटक करण्याची मागणी देखील सतीश यांनी याचिकेद्वारे केली.

Total Visitor Counter

3199521
Share This Article