देवरुख (प्रतिनिधी): तालुक्याचे मध्यवर्ती केंद्र आणि महत्त्वाचे शैक्षणिक, प्रशासकीय तसेच बँकिंग हब असलेल्या देवरुख शहरात गेल्या अनेक वर्षांपासून सार्वजनिक प्रसाधनगृहाची समस्या गंभीर बनली आहे. शहराने लोकसहभाग आणि स्वच्छतेच्या जोरावर राज्य स्तरावर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक व मानाचे पुरस्कार पटकावले असले, तरी प्रत्यक्षात बाहेरून येणाऱ्या सामान्य जनतेला आणि पर्यटकांना साध्या एका स्वच्छ प्रसाधनगृहासाठी वणवण भटकावे लागत असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. पूर्वी ग्रामपंचायतीच्या काळात असलेले प्रसाधनगृह तहसील कार्यालयाच्या नूतन इमारतीसाठी पाडण्यात आले, मात्र त्यानंतर नवीन प्रसाधनगृहासाठी अद्याप जागाच उपलब्ध होऊ शकलेली नाही.
तहसील प्रशासनाने जागा देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र अनेक वर्षे उलटूनही नगरपंचायतीला या कामासाठी मुहूर्त मिळालेला नाही. कोट्यवधी रुपयांची विकासकामे शहरात होत असताना सार्वजनिक आरोग्याशी निगडित या प्रश्नाकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.
देवरुख एसटी बसस्थानकात प्रसाधनगृहाची सोय असली तरी तिची अवस्था असून नसल्यासारखीच आहे. मोडके दरवाजे, दुर्गंधी आणि अस्वच्छतेचे साम्राज्य यामुळे नागरिक तेथे जाणे टाळत आहेत. हीच परिस्थिती पोलीस वसाहतीजवळील स्वच्छतागृहाची असून, तिथे पाणी नाही आणि दरवाजेही तुटलेले आहेत. या दयनीय अवस्थेमुळे बाहेरून येणाऱ्या महिला व वृद्धांची मोठी अडचण होत आहे. याबाबत प्रशासनाकडून विचारणा केली असता केवळ ‘लवकरच निर्णय घेऊ’ अशी उत्तरे देऊन वेळ मारून नेली जात आहे. विशेष म्हणजे, कार्यालयात येणाऱ्या जनतेने त्या-त्या कार्यालयातील प्रसाधनगृहाचा वापर करावा, असे सांगून मूळ समस्येकडे कानाडोळा केला जात आहे. स्वच्छ सुंदर अभियानात नाव कमावणाऱ्या देवरुख नगरपंचायतीने आता तरी या महत्त्वाच्या सुविधेच्या उभारणीसाठी तातडीने पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.






